कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:30 AM2021-04-19T04:30:41+5:302021-04-19T04:30:41+5:30
माजलगाव : शहरासह परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी तब्बल ७ कोविडबाधितांचा मृत्यू ...
माजलगाव : शहरासह परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वरचेवर वाढत असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. रविवारी तब्बल ७ कोविडबाधितांचा मृत्यू झाला. या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून मृतांच्या नातेवाइकांकडे सहा हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याची तक्रार खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
माजलगाव येथे शासकीय कोविड सेंटर असून, याठिकाणी केवळ प्राथमिक उपचार केले जातात. याठिकाणी अद्याप ऑक्सिजन व्यवस्था नसल्यामुळे खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. देशपांडे व राजेभोसले हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसह इतर सुविधा उपलब्ध आहेत. सध्या वरील सर्व ठिकाणी जवळपास चारशे रुग्ण उपचार घेत असल्याने जागा शिल्लक नाही. आतापर्यंत शासकीय नोंदीनुसार एकूण ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, रविवारी एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा मृत्यू झाला, त्यानंतर त्याच्या अंत्यविधीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना ५-६ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, पैसे नसल्याने नातेवाइकांनी ही बाब कोविड केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या खा. प्रीतम मुंडे यांच्या कानावर घातली. खा. मुंडे यांनी एक रुपयादेखील कोणास देऊ नका, असे सांगून तात्काळ नगर परिषद अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर मृतावर मोफत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-------
कोट,
कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी कर्मचारी पैसे मागत असल्याची माहिती मिळाली आहे. याविषयी अधिक खात्री करून कार्यवाही केली जाईल.
- वैशाली पाटील, तहसीलदार
-----
मृत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र, स्मशानभूमीत लागणाऱ्या सरपणासाठी पैसे द्यावे लागतात. अंत्यविधीसाठी लागणारे सरपण व इतर वाहतूक व्यवस्था नातेवाईक यांनीच करायची आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी कोणालाही पैसे मागितलेले नाहीत.
-विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगरपालिका