जिल्ह्यात कोरोनाने हिरावले ५६ मुलांचे आई-बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:34 AM2021-05-27T04:34:36+5:302021-05-27T04:34:36+5:30
बीड : कोरोना महामारीचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या घडीत अनेकांवर आभाळ कोसळले. अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण ...
बीड : कोरोना महामारीचे थैमान सर्वत्र सुरूच आहे. या संकटाच्या घडीत अनेकांवर आभाळ कोसळले. अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधार हरवला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनासोबतची झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ५५ मुलांचे आई-बाबा यांच्यापैकी एकाला हिरावले, तर एकाचे दोन्ही छत्र हरपले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १८६८ मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मातृ-पितृ हरवलेल्या मुलांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, यंत्रणा माहिती संकलनाच्या कामाला लागली आहे.
७ मे रोजी शासन निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दलाचे गठन करण्यात आले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत माहिती संकलित केली जात आहे.
आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असल्यास ११०० रुपये मदत
कोरोनामुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास शासनामार्फत दरमहा मदत दिली जाणार आहे. बीड जिल्ह्यात बालसंगोपन योजनेत ४५० मुले लाभार्थी आहेत, तर ३२ मान्यताप्राप्तपैकी ८ बालगृहांमध्ये १६८ मुले आहेत. ६ ते १८ वयोगटातील ज्यांचे आई किंवा वडील अथवा दोन्ही नाहीत त्यांच्यासाठी दिल्या जाणाऱ्या मानधनात ६७५ रुपयांची वाढ करून ११०० रुपये निश्चित केले आहे. कोरोनामुळे मातृ-पितृ छत्र हरवलेल्या मुलांनाही या योजनेत समाविष्ट केले आहे.
------------
या अनाथ मुलांचे सरकार काय करणार?
कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या मुले-मुलींचा ग्रामसेवक, अंगणवाडी ताई, आशा स्वयंसेविकांमार्फत शोध घेतला जात आहे. कोविड मृताचे नाव, वय, पत्ता, पालक संपर्क पत्ता व पूरक माहिती संकलित केली जात आहे. हा अहवाल आल्यानंतर परिविक्षा अधिकारी गृहचौकशी करतात. त्यानंतर बालसंगोपन योजना किंवा बालगृहातून लाभ देण्याबाबत निर्देश असल्याचे परिविक्षा अधिकारी एस. एस. निर्मळ यांनी सांगितले.
----------
कोरोनाने आई किंवा बाबा हिरावलेल्यांची संख्या ५५
आई व बाबा हिरावलेल्यांची संख्या - ०१
---------------
मुले ३६
मुली २०
--------------
७ मे रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध विभागांकडून ग्रामपातळीवर एक पालक, द्वीपालक गमावल्याची माहिती घेतली जात आहे. शहरी भागात नगर परिषद व आरोग्य विभागाकडून माहिती घेतली जात आहे. अशा मुलांची गरज, इच्छेनुसार बालसंगोपन योजना, बालगृहाद्वारे अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, शिक्षण, पुनर्वसन केले जाणार आहे. एकही मूल उघड्यावर राहणार नाही. दर आठवड्याला संकलित होणारी अद्ययावत माहिती एका क्लिकवर राज्य व केंद्र शासनाला पाठविली जात आहे.
- व्ही. एम. हुंडेकरी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, बीड.
--------------