कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:30 AM2021-03-15T04:30:15+5:302021-03-15T04:30:15+5:30

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच ...

Corona disrupts market, oil continues to explode | कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

कोरोनामुळे बाजार विस्कळीत, तेलाचा भडका सुरूच

googlenewsNext

बीड : कोरोना, लॉकडाऊन नियमांचा फटका बसत असल्याने किराणा, भाजी आणि फळबाजार विस्कळीत झाले आहे. रविवारी शहरातील मंडया तसेच गुजरी बाजारांमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी दिसून आली.

किराणा बाजारात ग्राहकी शांत असली, तरी तेलांचे भाव मात्र दररोज वाढतच आहेत. सूर्यफुल तेलाचा १५ लीटरचा डबा २५५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोयाबीन तेलही २०५० रुपयांना १५ लीटरचा डबा विकला जात आहे. परिणामी, ग्राहक तेल खरेदीमध्ये काटकसर करत आहेत. मागील १५ दिवसांत एका लीटरमागे तेलात २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. डाळींसह साखर, गूळ, तुपाचे दर स्थिर आहेत. लग्न, धार्मिक कार्यक्रम, सप्ताह, आदी सार्वजनिक कार्यक्रमांवर प्रतिबंध असल्याने किराणा मालाचा उठाव कमी आहे. त्यामुळे अतिरिक्त ग्राहक नसून घरगुती ग्राहक बाजारपेठेत दिसत आहेत. फळांच्या बाजारात द्राक्षांची आवक वाढली आहे. कलिंगड आणि खरबुजालाही चांगली मागणी आहे. संत्रीची आवक कमी झाली असून मोसंबी चांगलाच भाव खात आहे. डाळिंबाची आवक अंशतः वाढल्याने भाव उतरले आहेत. तर, सफरचंदाचा भाव स्थिर आहे. येथील मंडईत सर्वच भाज्यांची चांगली आवक होत असली, तरी कोरोनामुळे ग्राहकी कमी होती. भाजी बाजारात उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू, कोथिंबिरीचे दर वाढले. लसणाच्या दरात मात्र २० रुपये किलोने वाढ होऊन ८० रुपये किलो झाले. मंडईत विक्रेते आणि ग्राहकांनी मास्कचा वापर केल्यास तसेच अंतर ठेवल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. नियमांचे पालन आवश्यक असल्याचे अमन पठाण या ग्राहकाने सांगितले.

सूर्यफुल १७० रुपये

सूर्यफुल तेल १७०, सोयाबीन तेल १४०, पामतेल १३० रुपये लीटर झाले. शेंगदाण्याचा भाव ११० ते ११५ रुपये होता. कोलम तांदूळ ५५ ते ६० तर बासमतीचे दर ९० ते १०० रुपये किलो होते. नवीन गव्हाचे भाव २४०० ते २५०० रुपये क्विंटल आहे.

खरबूज, टरबूज स्वस्त

लालबाग, बदाम आंबे १०० ते १२० रुपये किलो, तर हापूस ४०० रुपये डझनप्रमाणे विकला जात आहे. द्राक्ष ५० ते ६० रुपये, खरबूज २० रुपये तर

कलिंगड ८ रुपये

किलो होते. डाळिंबाचे भाव घसरून १२० तर आवक घटल्याने संत्रीचे भाव ८० रुपयांपर्यंत होते.

कांदे, बटाटे घसरले

ग्राहकी नसल्याने गवार शेंग ६० ते ८० रुपये किलो होती. शेवगा, दोडका, शिमला, हिरवी मिरची, भेंडीचे दर ३० ते ४० रुपये किलो होते. बटाटे १५ तर कांद्याचे भाव २० रुपये किलोपर्यंत घसरले. लसणाचे भाव ८० तर आले ४० रुपये किलो होते. मेथी जुडी ३ तर कोथिंबीर जुडी २ रुपये होती. लिंबाचे भाव मात्र २५० रुपये शेकडा होते.

गर्दी खूप होते म्हणून ग्राहक फिरकत नाहीत. भाव कमी असूनही मोठ्या प्रमाणात ग्राहकी घटली आहे. - हुजेब समीर बागवान, भाजीविक्रेता

शिवरात्रीला शिवालये बंद होती. मोठे कार्यक्रम नसल्याने साबुदाणा, भगर, उपवासाच्या पदार्थांना उठाव कमी होता. बाजारावर त्याचा परिणाम झाला. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

कोरोनामुळे व लॉकडाऊनच्या नियमांचा परिणाम ग्राहकीवर झाला. बाजारात फळांची मुबलकता असूनही चार दिवसांपासून ग्राहकी अत्यंत कमी आहे. -शकूर बागवान, फळविक्रेता

Web Title: Corona disrupts market, oil continues to explode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.