अंबाजोगाई तालुक्यात ९५ गावांना कोरोनाचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:30+5:302021-04-30T04:42:30+5:30
अंबाजोगाई : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. अंबाजोगाई ...
अंबाजोगाई : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. अंबाजोगाई तालुक्यात एकूण ९९ ग्रामपंचायती आहेत. त्यातील ९४ गावांत कोरोनाची लागण झाली आहे, तर पाच गावांनी कोरोनाला गावाबाहेरच रोखले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख वाढतच चालला आहे. प्रारंभीच्या काळात शहरी भागात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र आता शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. तालुक्यात आजपर्यंत कोरोनाची रुग्णसंख्या नऊ हजारांच्या जवळ जाऊन थांबली आहे; तर ग्रामीण भागात आजपर्यंत चार हजार कोरोनाचे रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील गावोगावी असणाऱ्या कोरोनाच्या १४०० रुग्णांवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांना आवश्यक त्या सेवा-सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जे रुग्ण गंभीर स्थितीत आहेत, अशा रुग्णांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, तर त्रास नसलेल्या रुग्णांना लोखंडी सावरगाव व इतर संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येते.
अंबाजोगाई तालुक्यात गेल्या आठ महिन्यांत सर्वाधिक रुग्ण एप्रिलमध्ये वाढले.
या गावांमध्ये मोठा प्रादुर्भाव
एप्रिल महिन्यात अंबाजोगाई तालुक्यात पाच हजारांजवळ रुग्णसंख्या गेली आहे. तालुक्यातील ९४ गावांना कोरोनाचा वेढा आहे. यात प्रामुख्याने जोगाईवाडी, मोरेवाडी, शेपवाडी, चनई या अंबाजोगाईलगतच्या गावांना कोरोनाची मोठी बाधा झाली आहे; तर तालुक्यातील चनई, साकूड, घाटनांदुर, लोखंडी सावरगाव, जवळगाव, राडी, मुडेगाव, भतानवाडी, पिंपळा धायगुडा अशा विविध गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत.
पाच गावांनी कोरोना रोखला
अंबाजोगाई तालुक्यात केवळ पाच गावांना कोरोनाला रोखता आले. इतर ९४ गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अशाही स्थितीत तालुक्यातील दगडवाडी, राक्षसवाडी, मुर्ती, दरडवाडी व सातेफळ ही पाच गावे अद्यापही कोरोनामुक्त आहेत.
रुग्णसंख्या वाढल्यास त्या गावामध्ये अँटिजेन टेस्टसाठी कॅम्प लावला जातो.
ग्रामीण भागातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे उपाय सुरू आहेत. ज्यांना लक्षणे व त्रास नाही, अशा २७८ रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. ग्रामस्थांनी कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर व सतत हात धुणे या त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. - संदीप घोणसीकर, गटविकास अधिकारी, अंबाजोगाई