कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:28 PM2022-06-18T15:28:23+5:302022-06-18T15:28:40+5:30
लातूर, उस्मानाबादला सेवा वर्ग, आयुक्तांच्या आदेशानंतर उपसंचालकांची कारवाई
बीड : कोरोनाकाळातील साहित्य खरेदीतील घोळ आणि कंत्राटी भरतीतील अनियमितता यावर ठपका ठेवून बीड जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांना उस्मानाबाद, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश माने यांची लातूरमधील उदगीर येथे सेवा वर्ग केली. डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. आयुक्तांच्या आदेशानंतर लातूर उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे यांनी ही कारवाई केली आहे. डॉ.राठोड व डॉ.माने यांना शुक्रवारी दुपारीच तडकाफडकी कार्यमुक्तही करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाकाळात कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली होती. तसेच कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता कंत्राटी पद्धतीने विविध पदांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश माने, डॉ.बाबासाहेब ढाकणे यांच्यावर जबाबदारी दिली होती. याच काळात खरेदी केलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी उपसंचालकांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत झाल्या होत्या.
याबाबत लातूर उपसंचालकांनी एका समितीमार्फत चौकशीही केली होती. याचा अहवाल आयुक्तांना देण्यात आला होता. यात या सर्वांना दोषी ठरविले होते. वाढत्या तक्रारी आणि समितीचा अहवाल पाहून आरोग्य आयुक्तांनी या सर्वांना जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्त करून इतर जिल्ह्यात सेवा वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर लातूर उपसंचालक डॉ.हेमंत बोरसे यांनी डॉ.राठोड यांना उस्मानाबाद तर डॉ.माने यांना लातूरमधील उदगीर येथे सेवा वर्ग केले. डॉ.ढाकणे यांच्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. परंतु डॉ.राठोड व डॉ.माने यांना तडकाफडकी कार्यमुक्तही करण्यात आले आहे. बीडचा एसीएसचा अतिरिक्त पदभार रायमोहाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष शहाणे यांच्याकडे साेपविण्यात आला आहे.
आंदोलने, तक्रारींची उशिरा दखल
जिल्हा रुग्णालयातील भरतीमधील अनियमितता, खरेदी घोटाळा आदींबाबात आंदोलने झाले. शिवाय तक्रारींचाही ढिगारा लागला होता. परंतु आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी झालेल्या तक्रारींची उशिराने चौकशी झाली. समितीने अहवाल देण्यापूर्वी एकदा 'बसून' अहवाल देण्याची 'हिंमत' दाखवली होती. परंतू समोरच्यांकडून 'बोर' उत्तर मिळाल्याने अहवाल तयार करून 'सें'ड केला होता. अखेर यावर शुक्रवारी कारवाई झाली.
घोटाळा झाला; आता वसुली कोणाकडून?
साहित्य खरेदीत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका समितीने ठेवला हे खरे असले तरी आता घोटाळ्यातील पैसे कोणाकडून वसूल करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. इतर तक्रारींची कधी दखल घेणार? उपसंचालकांनी जशी कारवाईत तत्परता दाखवली, तशी इतर प्रकरणांतही दाखवावी, अशी मागणी होत आहे.