कृषी विभागाला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:32 AM2021-05-17T04:32:42+5:302021-05-17T04:32:42+5:30
बीड : खरीप हंगाम जवळ आला असून, कृषी विभागाकडून विविध कारणास्तव गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, ...
बीड : खरीप हंगाम जवळ आला असून, कृषी विभागाकडून विविध कारणास्तव गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे, तसेच विविध उपक्रमही राबवले जात आहेत. मात्र, जिल्हा व प्रत्येक तालुका कार्यालयातील २५ टक्के अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, लस घेण्यास गेलेल्या कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मात्र, फ्रंटलाईन वर्कर नसल्याचे सांगून लस देण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगाम महत्त्वाचा आहे. त्यासाठी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधावा लागत आहे. सोयाबीनचे घरचे बियाणे वापरण्यासाठी शासन पातळीवरून उगवण क्षमता प्रात्यक्षिके राबवण्याचे आदेश आलेले आहेत. ती सर्व कामे जवळपास पूर्ण झाली असून, जिल्ह्यातील सर्वच कृषी कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. अनेकांच्या घरचे सदस्य कोरोना पॉझिटिव्ह देखील आले आहेत. त्यामुळे वेळोवेळी फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन लसीकरण करावे, अशी मागणी केली असताना, देखील शासनाने याची दखल घेतली नाही. ऐन खरिपाच्या तोंडावर कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामळे खरिपाचे नियोजन बिघडण्याची चिंता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
.....
आम्ही फिल्डवर काम करतो. त्यामुळे कोरोना धोका कायम आहे. दरम्यान आम्ही पॉझिटिव्ह आलो असलो तरी आमच्या कुटुंबाचा काय दोष आहे. अनेक सदस्य पॉझिटिव्ह आलेत. याला जबाबदार कोण? त्यामुळे सर्व कृषी विभागीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ लस देण्यात यावी.
-एक कृषी अधिकारी.
.................................
शासनाकडे लस मिळण्यासाठी मागणी केली आहे. कृषी विभागास अनेक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती. मात्र, शासनस्तरावरून निर्णय होणे गरजेचे आहे. तरी देखील लसीचा साठा जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्यानंतर सर्वांना लस दिली जाईल.
-रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी, बीड.