धारूरमध्ये कोरोनाने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:22+5:302021-05-15T04:32:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : ग्रामीण भागातही कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी धारुर तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : ग्रामीण भागातही कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी धारुर तालुक्यातील चोरांबा येथील एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. या कोरोनाबाधित युवकावर नगर परिषदेकडून येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल चोरांबा येथील युवकावर उपचार सुरू असताना निधन झाले. दोन दिवसांपासून या युवकास श्वसनाचा त्रास होत होता. त्यास गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र यातच त्याचे निधन झाले. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी दिली. त्याची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने नगर परिषदेकडून येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, अधीक्षक नितीन इजाते, सचिन डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी केशव नाईकवाडे, भागवत डोहिफोडे, सुंदर लोखंडे, महेंद्र सिरसाट, विश्वास जाधव, गेना शिंदे, मुना ठाकूर आदींनी अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली.
धारुर तालुक्यातही मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजपर्यंत तालुक्यात ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील बहुतेक कोरोनाबाधित मृत्यू हे अंबाजोगाई येथे झालेले आहेत. उपचार सुरू असताना येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे.