कोराेनाने राेखली १२२० शाळांची धूरमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:53+5:302021-04-07T04:34:53+5:30
बीड : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा धूरमुक्तीचा संकल्प करण्यात आला. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे ...
बीड : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजविण्यासाठी जिल्ह्यातील शाळा धूरमुक्तीचा संकल्प करण्यात आला. मात्र मागील वर्षभरापासून कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असल्याने आणि इतर शैक्षणिक उपक्रम थांबल्याने धूरमुक्तीच्या संकल्पनेला अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १२२० शाळांच्या धूरमुक्तीचा प्रश्न तसाच कायम आहे.
बीड जिल्ह्यात २०१९ मध्ये धूरमुक्त अभियान राबविण्यात आले होते. शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी चुली बंद करून सर्व शाळांनी लोकसहभागातून गॅस कनेक्शन उपलब्ध करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा पातळीवर शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना यासंदर्भात पत्र देऊन चौदाव्या वित्त आयोगातून खर्च करण्याचेही निर्देश दिले होते. जिल्ह्यातील २२०० शाळांना गॅस कनेक्शन देण्यात आले असून १२२२ शाळा गॅस कनेक्शनपासून दूर राहिल्या आहेत. या शाळांमध्येही धूरमुक्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र कोविडच्या पार्श्वभूमीवर वर्षभर शाळा बंद राहिल्या. त्यामुळे शाळेत खिचडी शिजली नाही. त्याच बरोबर या विषयाकडेही दुर्लक्ष झाले प्रतिसाद कमी मिळत आहे. पत्रव्यवहार सुरू आहेत परंतू शाळा बंदमुळे शिक्षण विभागाला हा विषय केंद्रीत करता आला नाही.
ज्या शाळांमध्ये गॅस उपलब्ध आहे तो मुख्याध्यापकांच्या नावावर आहे. बैठक घेऊन गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांना गॅस कनेक्शन कसे घ्यायचे असे अपेक्षित आहे आणि धूरमुक्ती करणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून देण्यात आले. जो योग्य सेवा देऊ शकेल अशा प्रमाणित एजन्सीमार्फत गॅस कनेक्शन खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात लागणारे सिलेंडर आणि भट्टे यांची मागणी करण्याबाबत सुचविले होते. त्याचबरोबर गॅस कनेक्शन पुरवठादारांकडून कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले रेग्युलेटरचा वापर कसा करावा, गॅस चालू बंद कसा करावा, त्याचा वापर करताना काय काळजी घ्यावी या सर्व गोष्टी प्रशिक्षणातून देण्यात आल्या.
प्रदूषण मुक्तीसाठी ग्रामीण भागात शाळांमध्ये गॅस कनेक्शन असाव म्हणून २०१९ मध्ये मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. गावे धूरमुक्त होत आहेत. शाळा सर्वांना शिक्षण देते, मग शाळा धूरमुक्त का नसावी यासाठी पाठपुरावा करण्यात आला. प्रदूषणविरहित स्त्रोत असलेला गॅस सिलेंडर वापरण्याचा आग्रह आहे. त्यामुळे लाकूडतोड थांबेल आणि गावाबरोबरच शाळा धूरमुक्त होतील - अजय बहीर, अधीक्षक, शालेय पोषण आहार.
जिल्ह्यातील शाळा ३४२२
गॅस कनेक्शन असलेल्या शाळा २२००
गॅस कनेक्शन नसलेल्या शाळा १२२२
गॅस कनेक्शन नसलेल्या तालुकानिहाय शाळा
आष्टी ७२, शिरूर ३९, गेवराई १११, धारूर ८४, अंबाजोगाई ५१, माजलगाव १९२, केज २०५, बीड २०३, परळी १३३, पाटोदा ४२, वडवणी ८८ एकूण १२२०