कोरोना प्रादुर्भावामुळे रस्ते झाले सुनेसुने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:03+5:302021-05-20T04:36:03+5:30
अंबाजोगाई : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसं कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी ...
अंबाजोगाई : सकाळी रस्त्यावर गर्दी करून गप्पा मारत उभी असलेली ग्रामीण भागातील माणसं कडक निर्बंधांच्या काळात दिसेनाशी झाली आहेत. यामुळे आपापसातला संवादच जणू हरपल्याची स्थिती झाली असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे.
एरव्ही सकाळी सात वाजताच गावातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा घोळक्याने उभे असलेले गावकरी आता दिसत नाहीत. रस्त्याच्या कडेला दांडीच्या पातेल्यात उकळी फुटलेल्या चहाच्या वाफा नाहीत की, त्याचा दरवळ नाही. कढईत उकळणाऱ्या तेलातल्या भाज्यांचा व वड्यांचा सुर्र आवाजही नाही अन् गावात घडलेल्या घटनांची चर्चाही नाही. गावच्या राजकारणाचा व घडामोडींचा आखाडा समजल्या जाणाऱ्या या चहा व पानटपऱ्या सध्या ओस पडल्या आहेत. चल ऊठ.. या गोष्टीवर चहा पाजतो.. असे हातावर टाळी देऊन दणक्यात आवाज देणारा वर्ग रस्त्यावरून गायब झाला आहे. त्यामुळे चहा पाजणारे व चहा पिणारे कोणीच दिसत नाहीत.
सकाळच्या गप्पा व चहा टपरीवर जाऊनच घ्यायचा असा दिनक्रम असलेल्या मंडळींची संख्या ग्रामीण भागात मोठी असते. त्यामुळे सकाळपासूनच गावातील रस्ते गर्दीने फुलून जातात. कोरोनामुळे गावाकडचे रस्ते जणू मुके झाल्याचा अनुभव सध्या येत आहे. नेहमी गर्दीतून वाट काढताना हॉर्न वाजविणाऱ्या दुचाकी गाड्या व चारचाकी वाहने आता रस्ते निर्मनुष्य असल्याने भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत. गावच्या पारावर, ओट्यावर व चावडीवर रंगणारी गप्पांची मैफल आता लुप्त झाली आहे.
...
घरात होतेय घुसमट
घरात बसून अनेकांची घुसमट होत आहे. परस्परातील संवाद दुरावला आहे. केव्हा हा कोरोना संपतो व सगळं सुरळीत होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंबाजोगाई-अहमदपूर रस्त्यावर पूस, घाटनांदूर असो की लोखंडी, आपेगाव, राडी, पाटोदा, देवळा, ममदापूर यांच्यासह ग्रामीण भागातील, गावातील वर्दळ सध्यातरी ठप्प झाली आहे.