कोरोना नियमांची होतेय पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:23 AM2021-07-10T04:23:33+5:302021-07-10T04:23:33+5:30
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या ...
अंबाजोगाई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत असलेल्या कामांना मागणी घटल्याचे चित्र आहे. सध्या शेतात मोठ्या प्रमाणात मशागतीची कामे, काढणी, मोडणी, ऊस लागवड सुरू असल्याने शेतमजुरांना शेतावरच मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, तर ग्रामीण भागातील बहुतांश मजुरांनी ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे स्थलांतर केले आहे. त्यामुळे रोजगार हमीच्या कामाची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. मजुरांच्या स्थलांतरामुळे हे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
अवैध वाळू उपशावर नियंत्रण दिसेना
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी होत आहे.
बाजारातील कोंडीवर उपाय हवेत
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडे बाजार भरतो ; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता ; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
व्यवसायासाठी नियमांची मोडतोड
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे. परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.