युवासेना संवाद मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:38 AM2021-08-13T04:38:49+5:302021-08-13T04:38:49+5:30

प्रभात बुडूख बीड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भातील माहिती देताना बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येबाबतीत चिंता व्यक्त केली ...

Corona rules trampled on youth army dialogue meet | युवासेना संवाद मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली

युवासेना संवाद मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली

Next

प्रभात बुडूख

बीड : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनासंदर्भातील माहिती देताना बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येबाबतीत चिंता व्यक्त केली होती. तसेच अतिसंवेदनशील जिल्हा असल्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहनदेखील नागरिकांना केले होते. मात्र, शिवसेनेच्या युवासेनेकडून बीडमध्ये गुरुवारी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी जमली होती तसेच कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली. सर्वसामान्यांवर नियमांचे निर्बंध घालून गुन्हे दाखल केले जातात. तसेच या कार्यक्रमातील सर्वांवर गुन्हे दाखल होणार का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि विस्तारक अंकित प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात शिवसेना, युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद सभा झाली. यावेळी मुंबईचे नगरसेवक अभय घोले, आदित्य शिरोडकर, कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, उपसचिव नीलेश महाले, जय सरपोतदार, योगेश निमसे, विपुल पिंगळे, माजी मंत्री बदामराव पंडित, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब अंबुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, अप्पासाहेब जाधव, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख अ‍ॅड. संगीता चव्हाण, नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सागर बहिर, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठी गर्दी यावेळी जमली होती. तसेच सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाच्या नियमांना धाब्यावर बसवत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमानंतर युवासेनेचे वरुण सरदेसाई यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता, त्यांनी ही फक्त संवाद यात्रा होती. गर्दीच्या संदर्भातील प्रश्न पश्चिम बंगाल निवडणुकीदरम्यान पंतप्रधानांना का विचारले नाहीत, असे म्हणत कार्यकर्त्यांच्या गर्दीसंदर्भातील प्रश्नाला बगल देत त्या ठिकाणावरून काढता पाय घेतला.

प्रशासन गुन्हे दाखल करणार का?

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत प्रशासनाकडून अनेक निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा गर्दीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात येते. दरम्यान, तरीदेखील कार्यक्रमाला परवानगी होती का? तसेच कोरोना नियम मोडल्यामुळे गुन्हे दाखल होणार का? असे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारले जात आहेत.

युवासेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियम मोडले असतील तर, तपासणी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

120821\12_2_bed_20_12082021_14.jpg~120821\12_2_bed_21_12082021_14.jpg

कार्यक्रमातील गर्दी ~युवासनेचे सचिव बोलतना व्यावसपिठावर नेते व गर्दी दिसत आहेत.

Web Title: Corona rules trampled on youth army dialogue meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.