खेड्यांमध्ये कोरोनाचा प्रसार, व्हेंटिलेटरही नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:36 AM2021-04-23T04:36:13+5:302021-04-23T04:36:13+5:30
अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : तालुक्यातील १०० पैकी ६० गावांत कोरोना पोहचला आहे तर ४० गावे कोरोनामुक्त आहेत. ...
अविनाश मुडेगांवकर
अंबाजोगाई : तालुक्यातील १०० पैकी ६० गावांत कोरोना पोहचला आहे तर ४० गावे कोरोनामुक्त आहेत. ग्रामीण भागात कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला असून एकही आरोग्य केंद्रात व्हेंटिलेटर उपलब्ध नाहीत.मात्र प्रत्येक आरोग्य केंद्रात केवळ एकच ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातू थेट रुग्ण अंबाजोगाई येथेच पाठवले जातात.
अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी येथील दोन रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून उपचार सुरू आहेत. रुग्णांना अत्याधुनिक उपचारपद्धती देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र दररोज रुग्णसंख्येचा वाढता ताण प्रशासनासमोर नवीन समस्या उपलब्ध करत आहेत. शहरी भागा बरोबर ग्रामीण भागात ही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. एप्रिलच्या २२ दिवसात रुग्णांनी तीन हजारांचा आकडा पार केला आहे. तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र तपासणीसाठी तालुक्यात कोरोनाच्या चाचणीसाठी अंबाजोगाईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे एकमेव तपासणी केंद्र आहे. इथे आर्टीपीसीआर, व अँटीजन अशा दोन्ही प्रकारच्या तपासण्या होतात. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अपुरा कर्मचारी वर्ग व वाढते रुग्ण अशी स्थिती या तपासणी केंद्राची झाली आहे.
२५ व्हेंटिलेटरची भर
स्वाराती रुग्णालयात ६३ व्हेंटिलेटर व २०७ ऑक्सिजन बेड तर लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ६२ व्हेंटिलेटर व २३८ ऑक्सिजन बेड आहेत. अंबाजोगाईत ४४५ ऑक्सिजन बेड व १२५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत.गुरुवारी अजून २५ नवीन व्हेंटिलेटर स्वाराती रुग्णालयाला प्राप्त झाले आहेत.
कोरोनाचे ४४७ बळी
अंबाजोगाई तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे ४४७ बळी झाले आहेत. तालुक्यात रुग्णांची वाढती संख्या व रुग्णांचा निष्काळजीपणा मृत्यूसाठी कारणीभूत आहे. आरोग्य विभाग रुग्णांच्या सेवेसाठी प्रयत्नशील आहे. तरीही कोरोनाची साथ आटोक्यात येईना. प्रशासनालाही नागरिकांच्या खंबीर साथीची गरज निर्माण झाली आहे.