कोरोना चाचणी, लस देताना प्राधान्य दिव्यांगांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:14+5:302021-09-09T04:41:14+5:30
बीड : कोरोना चाचणीसह लस घेण्यासाठी दिव्यांगांची गर्दी झाल्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाले. हाच धागा पकडून आता दिव्यांगांसाठी ...
बीड : कोरोना चाचणीसह लस घेण्यासाठी दिव्यांगांची गर्दी झाल्याचे प्रकार राज्यात अनेक ठिकाणी झाले. हाच धागा पकडून आता दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था करून चाचणी व लस घेताना हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्याबाबत सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी काही दिवसांपूर्वीच स्वतंत्र व्यवस्था करून लसीकरण करण्यात आले होते. यात बहुतांश दिव्यांगांनी लस घेतली होती. परंतु राज्यातील काही जिल्ह्यात आजही दिव्यांगांना सामान्यांच्या रांगेत उभा राहून लस घ्यावी लागत आहे. तसेच कोरोना चाचणीसाठी गेल्यावरही त्यांचे हाल होत असल्याचे दिसते. हीच बाब निदर्शनास आल्यानंतर प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी शासन आदेश काढत दिव्यांगांना चाचणी व लस देताना प्राधान्य द्या, अशा सूचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांच्यात इतरांप्रमाणे प्रतिकारशक्ती नसते. त्यांना सन्मान देण्याबरोबरच सुविधाही देण्याचे आदेश डॉ. व्यास यांनी दिले आहेत.