खासगी रुग्णालयात जाणाऱ्यांनाही कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:35+5:302021-04-03T04:30:35+5:30
बीड : आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप ...
बीड : आता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शुक्रवारी आदेश काढले आहेत. जे लोक चाचणी करणार नाहीत त्यांच्यावरही आणि संबंधित रुग्णालयांवरही कारवाई करण्याचा इशाराही जगताप यांनी दिला आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हाताबाहेर जात आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासह बाधितांचा शोध घेण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे. पूर्वी लक्षणे असणाऱ्यांनाच कोरोना चाचणी बंधनकारक केली होती. आता खासगी रुग्णालयात येऊन भरती होणाऱ्यांची आरटीपीसीआर तर बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्यांची ॲन्टिजन चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याची तपासणी करण्यासाठी एका नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या रुग्णालयात २० खाटांची क्षमता आहे, तेथे आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था करणे आवश्यक आहे. त्याचे प्रशिक्षण व साहित्य सीएसने उपलब्ध करून देत एकाही रुग्णाकडून शुल्क आकारू नये, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जे लोक याचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही जगताप यांनी दिला आहे.