दुकान उघउायचंय तर कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:36 AM2021-03-09T04:36:25+5:302021-03-09T04:36:25+5:30
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता व्यापाऱ्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी ...
बीड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आता व्यापाऱ्यांनाही कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिकांनी चाचणी करणे अनिवार्य असून चाचणीशिवाय दुकान उघडल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सोमवारी याबाबत आदेश काढले आहेत
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संसर्ग वाढत असतानाही नागरिक गाफिलच राहात आहेत. प्रशासनाकडून वारंवार उपाययोजना करून कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे, परंतु याकडे कोणीच लक्ष देत नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची सरसकट कोरोना चाचणी करण्याचे बंधनकारक केले आहे. १५ मार्चपर्यंत सर्वच व्यापारी, व्यावसायिक, दुकानदारांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. त्याशिवाय दुकाने उघडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. यासाठी तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचनाही केल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, गतवर्षी राबविलेल्या विशेष मोहिमेत व्यापारी, दुकानदारांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य केले होते. जे बाधित आहेत ते लवकर निष्पन्न होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आता यावेळी व्यापारी किती प्रतिसाद देतात, हे वेळच ठरविणार आहे.
महाशिवारात्रीदिवशी फळविक्रेत्यांना परवानगी, पण..
महाशिवरात्रीच्या दिवशी मोठी बाजारपेठ अथवा इतर ठिकाणी एका जागेवर १० फळविक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्यात १० फुटांचे अंतर असणे बंधनकारक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून त्यांना ही परवानगी दिली जाणार असून जे कोरोना नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.