कोरोना लसीकरण, लातूर मंडळात बीड अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:34 AM2021-01-23T04:34:24+5:302021-01-23T04:34:24+5:30
फोटो २२ बीईडीपी-२१ बीड जिल्हा रुग्णालयात लाभार्थ्यांना कोरोना लस देतानाचे छायाचित्र. बीड : सुरुवातीच्या तांत्रिक अडचणी पार करून बीड ...
फोटो २२ बीईडीपी-२१ बीड जिल्हा रुग्णालयात लाभार्थ्यांना कोरोना लस देतानाचे छायाचित्र.
बीड : सुरुवातीच्या तांत्रिक अडचणी पार करून बीड जिल्ह्याने कोरोना लसीकरणाच्या चौथ्या दिवशी लसीकरणात लातूर मंडळात अव्वल स्थान पटकावले. उद्दिष्टापेक्षा ५१ टक्के लसीकरण जास्त केले. तर नांदेड जिल्ह्यात केवळ ४६ टक्के लसीकरण झाले.
लातूर मंडळात लातूरसह बीड, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे. या चार जिल्ह्यांत कोरोना लसीकरणासाठी १९ केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. प्रत्येक केंद्रावर दररोज १०० लाभार्थ्यांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला कोवीन ॲप व इतर तांत्रिक अडचणींमुळे लसीकरणाचा टक्का कमी होता. परंतु, शुक्रवारी बीड जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला. जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, गेवराई, परळी आणि आष्टी केंद्रांवर ५०० लस देणे अपेक्षित होते. परंतु, शुक्रवारी तब्बल ७५७ लस देण्यात आल्या. याचा टक्का १५१ एवढा आहे. तर दुसऱ्या बाजूला नांदेड जिल्ह्यात पाच केंद्रावर २२८ लोकांना लस देण्यात आली. याचा टक्का अवघा ४६ असून मंडळात हा निच्चांक आहे. उस्मानाबादचे लसीकरण १०३ टक्के झाले असून लातूरचे ५५ टक्के झाले आहे. एकूण मंडळाचे लसीकरण ८६ टक्के झाले आहे.
बीड, अंबाजोगाई अव्वल
प्रत्येक केंद्रावर १०० चे उद्दिष्ट आहे. बीड जिल्हा रुग्णालयात तब्बल १९४ तर अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात १९१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मंडळात हे दोन्ही केंद्र अव्वल राहिले. बीड जिल्ह्यातील प्रत्येक केंद्राचे लसीकरण १०० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे.
दिलासा, एकालाही त्रास नाही
मंडळातील चार जिल्ह्यांत शुक्रवारी दिवसभरात १६२६ लोकांना लस देण्यात आली. सुदैवाने यातील एकालाही कसलाच त्रास जाणवला नाही. त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास निर्माण होत आहे. बीड जिल्ह्याने लोकांच्या मनातील गैरसमज काढून लसीकरणाची टक्केवारी वाढवून पूर्ण केले आहे.
कोट.............
सुरुवातीला थोड्या अडचणी होत्या. आता त्या दूर झाल्या आहेत. शुक्रवारी जिल्ह्यातील पाच केंद्रांवर ७५७ जणांना लस देण्यात आली. सुदैवाने यात एकालाही लक्षण जाणवले नाही त्यामुळे न घाबरता सर्वांनी लस घ्यावी. मनातील गैरसमज दूर करावेत.
डॉ.आर.बी.पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
लातूर मंडळातील लसीकरण
जिल्हा केंद्रउद्दिष्टलाभार्थीटक्का
बीड- ५ ५०० ७५७ १५१
उस्मानाबाद-३ ३०० ३०९ १०३
नांदेड-५ ५०० २२८ ४६
लातूर- ६ ६०० ३३२ ५५