कोरोना लसीकरण टक्का वाढतोय; लाभार्थी म्हणतात, मनात भीती न बळगता घेणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:24+5:302021-01-25T04:34:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अनेक तांत्रिक अडचणींमुळे टक्का कमी होता. परंतु ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला अनेक तांत्रिक अडचणींमुळे टक्का कमी होता. परंतु मागील दोन दिवसांत उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण झाल्याने जिल्ह्याचे लसीकरण वाढले आहे. बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या बाजूला लाभार्थ्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले असून सर्वांनीच लसीबद्दल सुरक्षित दर्शवून लस घेणार असल्याचे सांगितले. जे लाभार्थी कोरोना बाधित आढळले होते, अशांना कोरोनामुक्त झाल्यापासून ९० दिवसांनी लस दिली जाणार आहे.
सध्या बीड जिल्ह्यात बीड जिल्हा रुग्णालयासह अंबाजोगाई, परळी, आष्टी आणि गेवराई येथे लसीकरण केंद्र तयार केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ हजार २६२ लोकांना लस टोचण्यात आली आहे. जिल्ह्याची टक्केवारी ९०पेक्षा जास्त आहे. राज्यात बीड जिल्ह्याने लसीकरण करण्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
रिॲक्शन काय?
लस घेतल्यानंतर साधारण १० टक्के लोकांना अंगदुखी, डोकं जड पडणे, ताप येणे, थंडी वाजणे, थकवा जाणवणे अशी किरकोळ लक्षणे जाणवू शकतात. आतापर्यंत लस घेतलेल्या ३६ लोकांना अशी किरकोळ लक्षणे जाणवली असली तरी ते अवघ्या काही तासांत तंदरुस्त झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
लसीबद्दल कसलीही भीती नाही, टक्का वाढतोय
कोरोना लसीबद्दल मनात असलेली भीती दूर झाल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढत आहे. बीड जिल्हा राज्यात तिसऱ्या स्थानावर असल्याने हे सिद्ध होत आहे. लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
-डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
मनात गैरसमज नसून लस सुरक्षित - काय म्हणतात लाभार्थी
लसीकरण मोहिमेत मी रोजच आहे. सोमवारी मी लस घेईल. याबाबत कोणीही मनात गैरसमज आणू नये. सर्वांनी लस घ्यावी.
- डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर
मी लस घेणार आहे. सुरक्षिततेबद्दल मनात कसलीही शंका नाही. इतरांनाही लस घेण्याबाबत प्रोत्साहित करेल.
- संगीता दिंडकर-तावरे, मेट्रन, बीड
कर्तव्य बजावताना कोरोनाची बाधा झाली. त्यावर मातही केली आणि पुन्हा आरोग्यसेवा सुरू केली. आता नियमानुसार कालावधी पूर्ण होत असून, मी कोरोना लस घेणार आहे. या लसीबद्दल मनात कसलीही भीती नाही. ही लस सुरक्षित असल्याचा विश्वास आहे. - डॉ. चैताली एल. भोंडवे, वैद्यकीय अधिकारी
मी लस घेतली आहे. सुरुवातीला थोडं डोकं जड पडल्यासारखे झाले, परंतु आता फ्रेश आहे. लस सुरक्षित असून, गैरसमज दूर ठेवावेत.
- दादासाहेब फाटक, फार्मासिस्ट, बीड
दोन तीन दिवसांत लस घेणार आहे. लसीबद्दल मनात कसलीही भीती नाही. माझ्या सहकाऱ्यांनाही लस घेण्यास सांगणार आहे.
- अनिता मुंडे, परिचारिका, एसएनसीयू