बीडच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना निगेटिव्ह अहवाल; आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अतिघाईने टेंशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 03:18 PM2021-04-21T15:18:53+5:302021-04-21T15:20:04+5:30
corona virus Beed हा अहवाल अंतीम करण्यापूर्वीच मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने तो घेतला आणि तात्काळ संबंधित रुग्णाला संदेश पाठविला.
- सोमनाथ खताळ
बीड : अंबाजोगाईच्या स्वाराती प्रयोगशाळेतून बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील रूग्णाला कोरोनाबाधित अहवाल दिल्यानंतर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याच रूग्णाला चक्क निगेटिव्ह अहवाल दिल्याचे उघड झाले. या सावळ्या गोंधळामुळे रुग्णाला मात्र, मानसिक त्रासाला सहन करावा लागत आहे. अशा प्रकारचा अहवाल पाटोदा तालुक्यातील दोन रुग्णांना असा अहवाल मिळाला आहे.
कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले अथवा लक्षणे असलेल्या लोकांचे आरटीपीसीआर स्वॅब घेतला जातो. त्याची तपासणी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंदतीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेत केली जाते. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळावर रोज दीड हजारांपेक्षा जास्त चाचण्या केल्या जातात. अहवाल तयार होताच आयसीएमआरच्या पोर्टलला त्याची नोंद होते. पाटोदा तालुक्यातीलही दोन व्यक्तींचा अहवाल पोर्टलला अपलोड करण्यात आला. हा अहवाल अंतीम करण्यापूर्वीच मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने तो घेतला आणि तात्काळ संबंधित रुग्णाला संदेश पाठविला. यात तो निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट नमूद होते. मात्र, काही तासांनी लगेच बीडच्या आरोग्य विभागाने या रूग्णांना संपर्क करून पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. दोन वेगवेगळ्या संदेशामुळे रूग्ण गोंधळून गेले होते. अखेर त्यांची समजूत काढून त्यांना तात्काळ कोविड सेंटरमध्ये दाखल करून उपचारास सुरूवात केली. या प्रकाराने चांगलीच धांदल उडाली होती. असेच प्रकार राज्याच्या इतर जिल्ह्यातही झाल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
बीडच्या आरोग्य विभागाचे सचिवांना पत्र
पाटोदा तालुक्यातील दोन रुग्णांचा अहवाल चुकीचा आल्याचे समजताच बीड आरोग्य विभागाने तत्काळ आपत्ती व्यवस्थापनच्या प्रधान सचिवांना पत्र पाठविले. यानंतर व्हॉट्स ॲपद्वारे चुकीचे देण्यात येणारे संदेश थांबविण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना करण्याची विनंती केली आहे. या चुकीच्या संदेशामुळे रूग्णांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा उल्लेख आहे.
संवाद कमी पडल्याने घोळ
मंत्रालयातून संदेशाची सुविधा चालू केली आहे, याची माहितीच प्रयोगशाळेला दिली नव्हती. मंत्रालय आणि आपत्ती विभाग यांच्यात योग्य संवाद न झाल्यानेच हा घोळ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून ही तांत्रिक चूक असल्याचे सांगून प्रकरण किरकोळ समजले जात असले तरी इकडे रूग्णांच्या काळजाचे ठोके वाढत आहेत. यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
अहवाल चुकीचा नव्हता. ती एक तांत्रिक चूक हाेती. याचे विश्लेषण मंत्रालयात दिलेले आहे.
-डॉ.संदीप निळेकर, प्रमुख, प्रयोगशाळा स्वाराती, अंबाजोगाई.
पाटोदा तालुक्यातील दोन रूग्णांना निगेटिव्ह असल्याचे मेसेज आले होते. मात्र, अंबाजोगाईच्या प्रयोगशाळेकडून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह होता. यामुळे काही वेळ संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत आम्ही संबंधित विभागाला पत्र पाठविले आहे.
-डाॅ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.