कोरोना व्हायरस; बीडची आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 11:19 PM2020-03-04T23:19:47+5:302020-03-04T23:20:16+5:30
सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला.
बीड : सौदी अरेबियामध्ये गेलेला नांदेडचा तरूण परतल्यानंतर त्याला सर्दी व ताप आला. त्याला ‘कोरोना’चा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. ही माहिती वाऱ्यासारखी मराठवाड्यात पसरली. त्यानंतर बीडचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. सर्व डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा काळजी घेण्यासह इतर उपाययोजनांबाबत सक्त सूचना करण्यात आल्या आहेत.
कोरोना व्हायरसने आतापर्यंत विविध देशांत ३ हजार बळी गेले आहेत. भारतातही काही संशयित आढळले आहेत. त्यातच नांदेड जिल्ह्यातील एक २५ वर्षीय तरूण सौदी अरेबियाला कामासाठी गेला होता. या आजाराच्या भीतीने तो परतला. नांदेडमध्ये येताच त्याला सर्दी, ताप येऊन कोरोनासारखी लक्षणे दिसू लागल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला. नांदेडची ही माहिती सोशल मीडियाद्वारे वाºयासारखी पसरली. त्यानंतर बीड जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.
अगोदरच जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करून यंत्रही तैनात केले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टरांना याबाबत सक्त सूचना आणि आदेश दिले आहेत. एकाही रुग्णाबाबत संशय जाणवताच त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी याबाबत आढावा बैठकाही घेतल्या आहेत.