Corona Virus : शाब्बास परळीकर! प्रशासनाला सहकार्य करत दिवसभर एकही नागरिक आला नाही रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 07:16 PM2020-03-29T19:16:01+5:302020-03-29T19:17:14+5:30
प्रशासनाने राबवला अनोखा प्रयोग
परळी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रविवारी परळीत पूर्णतः लाॅकडाऊन पाळण्यात आला नागरिकांनी आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिल्याबद्दल प्रशासनाने परळीकरांचे आभार व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे स्थानिक प्रशासनाने महाराष्ट्रात फक्त परळीतच हा यशस्वी सोशल डिस्टंस् उपक्रम राबविला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर सोशल डिस्टन्सिंग एवढाच प्रभावी उपचार असल्याने प्रशासनाने आज परळी शहरात संपुर्ण लाॅक डाऊनचे आवाहन केले होते. शहरात प्रशासनाच्या वतीने किराणा दुकानदार, भाजीपाला व फळ विक्रेते यांना आपले दुकान बंद करणे बाबत आवाहन केले होते. त्याला परळीकर जनतेने,किराणा दुकानदार,फळ विक्रेते,भाजीपाला विक्रेते यांनी 100%प्रतिसाद दिला. आज दिवसभर केवळ दवाखाना आणि मेडिकल चालू होते. विशेष म्हणजे रस्त्यावरही कुणी फिरताना दिसले नाहीत.
नागरीकांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रशासनाने परळीकरांचे आभार मानले. आगामी काळातही जनतेने असेच सहकार्य करून कोरोना विरूद्धाची लढाई तीव्र करावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार डॉ. विपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे ,न. प. मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, वैद्यकीय अधिक्षक डॉ रामेश्वर लटपटे,आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे,पोनि.बाळासाहेब पवार,पोनि.हेमंत कदम,तलाठी गंगाधर राजुरे यांनी केले आहे.