corona virus : लग्नकार्यात कोरोनाचे विघ्न; मंगलकार्यालय बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 05:48 PM2020-03-16T17:48:33+5:302020-03-16T17:49:16+5:30
शासन निर्णयाने मंगलकार्यालय बंदी
कडा : सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाची धास्ती बसली असून त्या अनुषंगाने प्रशासन सज्ज झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा देखील जिल्ह्य़ात लागू करण्यात आला आहे. तसेच मंगल कार्यालय आणि एकत्र जमाव जमवणे यावर शासननिर्णयाने बंदी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे विघ्न लग्नकार्यातही ठरू लागल्याची चर्चा रंगत आहे.
कोरोनाबद्दल नागरिकांनी खबरदार घ्यावी यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. शाळा, कॉलेज यांना सुट्ट्या दिल्या तर धार्मिक स्थळे, चित्रपट गृहे, मज्जीद , आठवडी बाजार, मोठमोठे माॅल यासह एकत्र गर्दी करण्यास बंदी घातली गेली आहे. यातच शासन निर्णयाने मंगलकार्यालयेही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामुळे ३१ मार्चपर्यंतची विवाह आता लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नववधू-वरांना देखील अडचणीचा सामना करावा लागत आहे. एक तर लवकर लग्न जमत नाही आणि जमले व काही अडचण आणि तर रखडत बसावे लागते अशी ग्रामीण भागात समजूत आहे. एकंदरीत नववधूवरांवर कोरोनाने विघ्न आणल्याचे दिसत आहे.