Corona Virus : कोरोना इफेक्ट; बीडमध्ये जनजागृती रॅली रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:10 AM2020-03-06T10:10:22+5:302020-03-06T10:10:52+5:30
पोस्टर प्रदर्शनातून मात्र, विद्यार्थ्यांनी जनजागृती करून रॅलीची उणिव भरून काढली.
बीड : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शासकीय जिल्हा रुग्णालयातील शासकीय नर्सींग महाविद्यालयातील विद्यार्थी कर्करोगावर जनजागृती करण्यासाठी आज सकाळी ८ वाजता रॅली काढणार होते. परंतु कोरोनाच्या भितीने ही रॅली रद्द करण्यात आली. पोस्टर प्रदर्शनातून मात्र, विद्यार्थ्यांनी जनजागृती करून रॅलीची उणिव भरून काढली.
जिल्हा रुग्णालयाती शासकीय नर्सिंग महाविद्यालयाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. ‘कर्करोगाविरुद्ध नर्सेसचा लढा’ ही थीम घेऊन शुक्रवारी सकाळीच बीड शहरात जनजागृती रॅली काढण्यात येणार होती. त्यानंतर पोस्टर प्रदर्शन भरविण्याचे नियोजन होते. परंतु कोरोनाच्या भितीने आणि गुरूवारीच मुख्य सचिवांनी सार्वजनिक आणि गर्दीचे कार्यक्रम घेणे टाळावे, अशा सुचना केल्याने ही रॅली रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी भ्रमणध्वणीवरून संपर्कही केला. परंतु त्यांनी फोन कट केल्याने बाजू समजली नाही.
दरम्यान, रॅली रद्द झाली तर विद्यार्थ्यांनी कर्करोग जनजागृतीवर विविध संदेश देणारे पोस्टर तयार करून त्याचे प्रदर्शन भरविले. आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याबाबत विद्यार्थ्यांनी माहितीही दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, मेट्रन संगिता दिंडकर, प्राचार्या डॉ.सुवर्णा बेदरे, उपप्राचार्या प्रा.शैलजा क्षीरसागर, प्रा.शिला मोहिते, प्रा.सोनाली देशमुख, प्रा.सिमा विघ्ने, प्रा.शितल मुंडे, प्रा.उल्का साळवे, प्रा.श्रीपाल ससाणे, विजया शेळके, संगिता सिरसाट, गृहपाल सुनिता यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सेल्फी पॉर्इंटवर गर्दी
पोस्टर प्रदर्शनच्या ठिकाणी एक सेल्फी पाँईटही तयार करण्यात आला होता. या ठिकाणी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, परिचारीका, रुग्णाच्या नातेवाईकांनी फोटोसाठी गर्दी केल्याचे दिसले.