Corona Virus : संचारबंदी शिथिलतेची वेळ बदली ; सकाळी-सकाळी व्यापारी,नागरिकांची उडाली तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 04:37 PM2020-03-29T16:37:15+5:302020-03-29T16:45:25+5:30
सुरुवातीला 11 ते 3 यावेळेत संचारबंदी शिथिल करण्यात आली होती
माजलगाव : संचारबंदीची वेळ शनिवारी अचानक बदलल्याने व्यापाऱ्यांना सकाळी सकाळी उठून आपली दुकाने उघडावी लागली तर ग्राहक सकाळीच साहित्य खरेदीच्या रांगेत उभा दिसून आले. विशेष म्हणजे , व्यापारी देखील ग्राहकांना शिस्तीचे धडे देऊन रांगेत येण्याचा आग्रह करत आहेेेत. ग्राहक देखील शिस्तीचे पालन करताना दिसून येत होते.
मागील आठवड्यात संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी दुपारी 11 ते 3 या काळात संचारबंदी शिथिल करण्यात येत होती. परंतु या दरम्यान अनेक जण काहीच काम नसताना रस्त्याने फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रस्त्यावरील गर्दी कमी करावी या उद्देशाने प्रशासनाने शनिवारी रात्री अचानक निर्णय घेऊन रविवारपासून अत्यावश्यक सेवेसाठी सकाळी सात ते साडे नऊ ही वेळ दिली. ही वेळ कळताच 9 -10 वाजता दुकानात उघडणारे व्यापारी धावत पळत सकाळी 7 वाजता बरोबर दुकान उघडून बसले होते.
दुकानदाराप्रमाणेच ग्राहक देखील सकाळी सात वाजल्यापासून पिशव्या घेऊन फिरताना दिसत होते. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक जण उठलेच नव्हते तर बिनकामाचे लोक इकडे फिरकलेच नाहीत. यामुळे किराणा साहित्य व भाजीपाला घेण्यासाठी मोजकेच लोक बाहेर पडले होते यामुळे रस्त्यावर देखील गर्दी जास्त दिसून आली नाही. काहीजण विनाकारण फिरणारे बाहेर येइपर्यंत सर्व व्यापार बंद दिसू लागले. व दहा वाजल्यापासून सर्व रस्ते सामसूम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
दरम्यान व्यापाऱ्यांनी ग्राहकांना ओट्याच्या खाली उभा करून दुरूनच त्यांना पाहिजे असलेले सामान दिले जात होते तर अनेक दुकानदारांनी दुकानाबाहेर हात धुण्यासाठी व्यवस्था केली होती. ग्राहक देखील या सर्व बाबींचे पालन करताना दिसत होते. हे सर्व सुरू असताना कोठेही छोटी-मोठी कुरबूर देखील पाहावयास मिळाली नाही. यावरून सर्व जण कोरोना विरोधात एकीने लढत असल्याचे चित्र सकाळी-सकाळी पाहावयास मिळाले.
व्यापाऱ्यांना सकाळी-सकाळी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याने व सर्वांनी वेळेत दुकाना उघडुन त्या वेळेत स्वतःहून बंद देखील केल्या यामुळे प्रशासनाचा देखील ताण कमी झाला.आम्ही सर्व व्यापाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे कोणतेही साहित्य जास्त दरात विक्री करू नये असे कळवले असून प्रत्येक दुकानदारांनी ग्राहकांना सेवा देताना शिस्तीत व लांब अंतर ठेवून व्यवहार केला. सकाळची वेळ असली तरी या काळात विनाकारण फिरणा-या लोकांचा त्रास कमी झाला.
-- संजय सोळंके , तालुका अध्यक्ष किराणा असोसिएशन