Corona Virus : कामचुकारांना दणका; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आष्टीतील एका डॉक्टरसह सात जणांची केली हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 11:23 AM2021-05-22T11:23:35+5:302021-05-22T11:29:06+5:30
Corona Virus : आष्टी कोवीड सेंटरमधील रूग्ण बाहेर फिरतात, डॉक्टर, परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या
बीड : कोवीड सेंटरमध्ये थांबून रूग्णसेवा करण्यात हलगर्जी करणाऱ्यांना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला आहे. एका डॉक्टरसह सात जणांची थेट हकालपट्टी केली आहे. आष्टी कोवीड सेंटरला शनिवारी पहाटेच अचानक भेट देऊन डीएचओ डॉ. आर.बी.पवार यांनी ही कारवाई केली. त्यामुळे कामचुकारांचे धाबे दणाणले आहेत.
आष्टी कोवीड सेंटरमधील रूग्ण बाहेर फिरतात, डॉक्टर, परचारिका उपचाराकडे दुर्लक्ष करतात, वॉर्डबॉय स्वच्छता करत नाहीत, अशा तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांनी याची गंभीर दखल घेत शनिवारी सकाळीच आष्टी गाठत कोवीड सेंटरची तपासणी केली. यात त्यांना भरपूर त्रूटी दिसल्या. तसेच कामात हलगर्जी झाल्याचेही दिसले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथे कर्तव्यावर असणाऱ्या डॉ.माधूरी पाचरणे, या डॉक्टरसह अश्विनी पांतागणे, रूपाली काळे या दोन एएनएम आणि चार वॉर्डबॉयची हकालपट्टी केली. तसेच दुसऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बोलावून घेत रूग्णसेवा देण्याच्या सुचना प्र.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन मोरे यांना दिल्या. या कारवाईने मात्र, खळबळ उडाली आहे.
डीएचओंप्रमाणे सीएस का कारवाई करत नाहीत?
उपचारातील हलगर्जी व सुविधांबाबतच्या तक्रारी प्राप्त होताच खात्री करून डीएचओ तात्काळ कारवाई करतात. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा रूग्णालयात रूग्णांच्या जीवाशी खेळ खेळला जात असतानाही आणि याबाबत ढिगभर तक्रारी प्राप्त होऊनही जिल्हा शल्य चिकित्सक कारवाईला आखडता हात घेत आहेत. कामचुकारपणा करूनही कारवाई होत नसल्याने यात 'अर्थ'कारण झाल्याचा आरोप सामान्यांतून होत आहे. जिल्हा रूग्णालय प्रशासन सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.