Corona Virus : 'जेवल्याशिवाय जायचे नाही'; कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी अनुभवली शेतकऱ्याची माया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:42 PM2020-03-31T12:42:54+5:302020-03-31T12:45:52+5:30
आमचंही कर्तव्य म्हणत शेतकऱ्याने केला पोलिसांचा पाहुणचार
बीड : संचारबंदीच्या काळात पोलीस यंत्रणेवर सुरक्षेच्या दृष्टीने ताण वाढला आहे. तहान-भूक विसरून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना ताणतणावाच्या काळात अन्नदाता शेतकऱ्याच्या मायेचा सुखद अनुभव आला. बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे एका शेतकऱ्याने पिठलं भाकरीची मेजवानी देत आपल्यातील माणुसकीचा परिचय दिला.
नागरिकांनी घरातच राहवे यासाठी पोलीसांकडून गस्त सुरु आहे. बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि सुजीत बडे, रमेश दुबाले, लक्ष्मण जायभाये पोह खय्युम खान, वाघमारे हे पिंपळनेर हद्दीत गस्तीवर होते. एका शेतात त्यांना पाणी देण्याचे कामं सुरु असल्याचे दिसले. तेथे पाणी पिण्यासाठी थांबले. बोलताबोलता हे पोलीस सकाळी ८ वाजल्यापासून ड्यूटीवर असल्याचे शेतकरी काशीद यांच्या लक्षात आले. ‘तुम्ही जेवलेले नाहीत, जेवल्याशिवाय जायचे नाही’ अशी गळ त्यांनी बडे यांना घातली. पोलीसांकडून नको असे उत्तर आले. त्यावर ‘तुम्ही आमच्यासाठी सकाळपासून बाहेर फिरता आमचेही कर्तव्य आहे. ’ असे म्हणत काशीद यांनी तात्काळ काही वेळात घरातल्या मंडळीला स्वयंपाक करायला लावला. पिठलं-भाकरी, चटणी, ठेचा, कांदा-मुळ्याची अस्सल गावराण मेजवानीने पोलीस अधिकारी, कर्मचारी तृप्त झाले. कृतज्ञता व्यक्त करत पुन्हा कर्तव्याला लागले.