corona virus : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५०, तरीही वृद्धाची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:41 PM2021-06-18T16:41:25+5:302021-06-18T16:42:04+5:30
corona virus in Beed जिल्हा रूग्णालयात ३८ दिवस उपचार घेतल्यानंतर वृद्धास रुग्णालयातून डिस्चार्ज
- सोमनाथ खताळ
बीड : एचआरसीटी स्कोअर २४, ऑक्सिजन लेव्हल ५० वर आली. कोमॉर्बिड आजार असल्याने मनात भिती. परंतू रूग्णाची जिद्द आणि आरोग्यकर्मिंच्या परिश्रमाच्या बळावर ७२ वर्षीय वृद्धाने कोरोनावर मात केली. ३७ दिवस उपचार घेऊन ३८ व्या दिवशी वृद्धाला सुटी देण्यात आली. हे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी वॉर्डात जावून वृद्ध व रूग्णसेवा देणाऱ्यांचे स्वागत केले. यामुळे सरकारी रूग्णालयाबद्दल विश्वास निर्माण झाला असून आरोग्यकर्मिंचे मनोबलही उंचावले आहे.
बीड तालुक्यातील घोडका राजूरी येथील ७२ वर्षिय वृद्धाला लक्षणे असल्याने ९ मे रोजी कोरोना चाचणी केली. १० मे रोजी ते पॉझिटिव्ह असल्याचे समजले. आगोदरच दमा असल्याने नातेवाईक घाबरले. तपासणी केली असता एचआरसीटी स्कोअर २४ आला तर ऑक्सिजन लेव्हलही ५० होती. या कठीण परिस्थितीतही डॉक्टरांनी परिश्रम घेणे सोडले नाही. तर या वृद्धानेही घाबरून न जाता जिद्दीने कोरोनाचा सामना केला. उपचारादरम्यान त्यांना बायपॅप आणि चार रक्ताच्या पिशव्या लागल्या. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर ३७ दिवस उपचार घेऊन हे वृद्ध शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. त्यांचे स्वागत करून जिल्हा रूग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे सरकारी रूग्णालयातही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उपचार मिळत असल्याचा संदेश समाजात गेला आहे.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वागत
रूग्ण गंभीर असतानाही त्याच्यावर योग्य उपचार आणि काळजी घेत त्याला नवे जीवन दिले म्हणून उपचार करणाऱ्या सर्वच डॉक्टर, परिचारीका, वॉर्डबॉयचे स्वागत करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे वॉर्डात पोहचले. आगोदर कोरोनामुक्त झालेल्या वृद्धाचा पुष्पगुच्छ देऊन व नंतर उपचार करणाऱ्या सर्वांचाच फुल देऊन स्वागत केले.
या टिमने केले उपचार
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.आय.व्ही.शिंदे, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.सचिन आंधळकर, मेट्रन रमा गिरी, संगिता दिंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फिजिशियन डॉ.रेवडकर, डॉ.भरत दुरगुडे, डॉ.स्वप्नील बडजाते, डॉ.बाळासाहेब टाक, डॉ.विशाल कोटेचा, डॉ.रूपाली बंड, वॉर्ड इन्चार्ज कुडके, परिचारीका मिरा मुंडे, स्वप्नाली तळेकर, अश्विनी सावंत, प्रियंका जाधव, आकाश भोसले, कविता लाड, प्रियंका शेळके, राजकन्या देवकुळे, राजपूत, खरमाटे यांनी ३७ दिवस उपचार करून वृद्धाला कोरोनामुक्त करून घरी पाठविले.
गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत
जिल्हा रूग्णालयात गुणवत्तापूर्ण व वेळेत उपचार होतात. ७२ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात करून आमच्या परिश्रमाची पावती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारी यंत्रणेबद्दलच गैरसमज दूर करून उपचार घ्यावेत. ही बाब कौतुकास्पद असल्याने सर्वांचेच स्वागत वाॅर्डात जावून केले. मला माझ्या टिमचा अभिमान वाटत आहे. यापुढेही असेच रूग्णसेवा होत राहिल.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड