corona virus : सुखद ! ७० वर्षीय आजीसह तीन नातवंडांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 06:35 PM2021-05-13T18:35:03+5:302021-05-13T18:36:43+5:30
corona virus : शहरातील कजबा विभागातील शाम पुजदेकर यांच्या ७० वर्षीय आई कोरोनाबाधित आढळल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.
धारूर : येथील पुजदेकर कुंटूंबातील ७० वर्षीय आजी आणि ५, ७ आणि ९ वर्षीय बालकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरानामूक्त झाल्यानंतर गुरुवारी घरी परतलेल्या चौघांचे नातेवाईकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. न घाबरता या बालकांनी उपचाराला प्रतिसाद देत कोरोनाला हरवल्याने त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे.
शहरातील कजबा विभागातील शाम पुजदेकर यांच्या ७० वर्षीय आई कोरोनाबाधित आढळल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात घरातील सर्व जेष्टांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र,सुमित ( ५), अदीती ( ७ ) आणि सोनू ( ९ ) या बालकांची चाचणी पॉझिटिव्ह आली. ७० वर्षीय आजी आणि अत्यंत कमी वयातील बालके कोरोनाबाधित असल्याने नातेवाईक चिंतेत होते. मात्र, आजीसह तीनही बालकांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत उपचार घेतले. येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचारांना त्यांनी प्रतिसाद देत कोरोनावर यशस्वी मात केली. उपचारादरम्यान तीनही बालकांनी कधीच घरी येण्याचा हट्ट धरला नाही अशी माहिती वडील शाम पुजदेकर यांनी दिली. कोविड सेंटरला उपचार घेऊन ७० वर्षीय आजीसह तीनही नातवंडे गुरूवारी घरी परतली. आजीसह घरी परत आलेल्या नातवंडांचे पुष्पवृष्टीकरून स्वागत करण्यात आले.