Corona Virus : अजब कारभार; महिनाभरापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा आरोग्य विभागातून कॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 06:22 PM2021-05-18T18:22:40+5:302021-05-18T18:27:02+5:30
Corona Virus : अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले आहे.
- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई : महिनाभरापूर्वी कोरोना बाधित झालेले मंडी बाजार परिसरातील डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप बाहेर पडले नाहीत तोच त्यांच्या कुटुंबियांना धर्मेंद्र गुप्ता कोण आहेत, त्यांना कोरोना झाला असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवा असे फोन त्यांच्या घरी खणानू लागले. जी व्यक्ती महिना भरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू पावली तीच व्यक्ती पुन्हा कोरोनाबाधित निघाली. हा चमत्कार घडवला आहे आरोग्य विभागाने! या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले. या घटनेला एक महिन्याच्या कालावधी लोटला आणि अचानकच १६ मे रोजी आरोग्य विभागाने कोरोना बधितांची यादी जाहीर केली. या जाहीर झालेल्या यादीमध्ये ५५ व्या क्रमांकावर धर्मेंद्र गुप्ता यांच्या नावाचा उल्लेख पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून करण्यात आला आहे. तसेच, ते नवीन रुग्ण म्हणून निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद आहे.
जे व्यक्ती कोरोनाबधित होतात त्या व्यक्तींची यादी पडताळणीसाठी व त्यांनी उपचार घ्यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात येतो. याकामी आरोग्य विभागागील कर्मचारी व शिक्षकांचे प्रभागनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती करण्यात आलेल्या शिक्षकांनी नेहमीप्रमाणे त्या व्यक्तीच्या नावासमोर असलेल्या मोबाईलवर फोन करून हा फोन धर्मेंद्र गुप्ता यांचा आहे का? ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात पाठवा असे फोन खानाणु लागले. डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे निधन होऊन महिना लोटला. अजूनही त्यांचे कुटुंबीय या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत. आशा स्थितीत मयत झालेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचा साक्षात्कार आरोग्य विभागाला झाला कसा ?
अहवालावर विश्वास ठेवायचा कसा?
जर मयत व्यक्तीला महिन्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह घोषित करण्यात येत असेल तर अशा अहवालवर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल उपस्थित होत आहे. अहवालातून इतरवेळेस अनेकदा पॉझिटिव्ह, निगेटिव्हचे चुकीचे निष्कर्ष देण्यात आले नसतील का अशी शंका विचारली जात आहे. अशा चुकांची गांभीर्याने दखल घेऊन सखोल तपासणी आवश्यक आहे.
ती आमची जबाबदारी नाही
आम्ही आरटीपीसीआर सँपल गोळा करण्याचे काम करत नाहीत, फक्त चाचणी करणे हे आमच्या प्रयोगशाळेचे काम आहे. आमच्याकडे आलेल्या सॅम्पलला कोड नंबर असतात. चाचणीनंतर रुग्णाच्या नावासह करण्यात येणाऱ्या यादीची जबाबदारी आमची नाही.
- डॉ. संदीप निळेकर, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र
सध्या कोरोनाबळीच्या प्रलंबित राहिलेल्या नोंदी वेबसाईटवर अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनवधानाने काही वेळेस जुन्या मयत रुग्णांची नावे पुन्हा यादीत येत आहेत. यानंतर अशा चुका होणार नाहीत याची दक्षता आम्ही घेऊ.
- डॉ. बालासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी