corona virus : परळीतील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ३१ मार्चपर्यंत राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 07:40 PM2020-03-16T19:40:19+5:302020-03-16T19:44:33+5:30
बीड जिल्ह्यातील २६ देवस्थाने राहणार बंद
- संजय खाकरे
परळी : देश व राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर भाविकांसाठी ३१ मार्चपर्यंत बंद असेल अशा सूचना बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमवारी दिल्या आहेत. तसे पत्र सायंकाळी 6.30 च्या सुमारास मंदिर सचिवास प्राप्त झाले. दरम्यान, मंदिरातील दररोजची पूजा नियमित होणार असून त्यासाठी केवळ पुजारीच उपस्थित राहणार आहेत.
सोमवारी प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी होती. राज्य व परराज्यातून येथे श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या गेल्या दोन दिवसापासून देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटली आहे. श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टने येणाऱ्या भक्तांची मंदिरात स्वच्छता करून विशेष खबरदारी घेतलेली आहेच. तसेच २ एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त आयोजित करण्यात आलेला गीत रामायण हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. येथील वैजनाथ मंदिरात दररोज सकाळी दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते व सायंकाळच्या वेळी शहरातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. तसेच रात्री सव्वा नऊच्या सुमारास दररोज आरतीला भक्तांची गर्दी होते ही भक्तांची गर्दी टाळण्याच्या सूचना बीडच्या जिल्हा प्रशासनाने केलेल्या आहेत.
परंतु वैद्यनाथाला दररोज होणारी आरती पूजा आता फक्त पुजारीच करतील .आरतीला भक्तांची गर्दी नसेल अशी काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी बीड यांनी सूचित केले आहे तसेच ३१ मार्चपर्यंत मंदिर व मंगलकार्यालयात होणारे विविध कार्यक्रम, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. भाविक भक्तांना प्रवेश बंद असेल, असे लेखी आदेश सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशाचे पालन केले जाईल अशी माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली
जिल्ह्यातील २६ देवस्थाने राहणार बंद
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील योगेश्वरी देवी मंदीर, परळीतील वैद्यनाथ मंदीर यासह २६ देवस्थाने भाविकांच्या दर्शनासाठी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिला आहे.