कोरोनामुळे माणसातला माणूस जागा झाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:41+5:302020-12-31T04:31:41+5:30
पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण ...
पाटोदा : माणसाची खरी ओळख ही संकटात होते. सुखात सर्वचजण आपले असतात , मात्र दु:खात व कठीण प्रसंगात आपल्या सोबत कोण राहतो ? याची ओळख २०२० या सरत्या वर्षात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे झाली. राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असताना वर्षभरातील सहा ते आठ महिने स्थलांतरित असलेल्या पाटोदा तालुक्यातील कष्टकरी जनतेमध्ये या रोगाचा उपद्रव तुलनेत तेवढा जाणवला नाही
कोरोना या महामारीने देशातील विविध राज्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यातही कहर निर्माण केला होता. त्यामुळे मार्च २० डिसेंबर २० या काळात राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उपद्रव सुरू असताना बीड जिल्ह्यात मात्र उपद्रव कमीच राहिला.
जिल्ह्यातील पाटोदा हा ऊस तोडणी मजूर म्हणजे कष्टकरी व स्थलांतरितांचा तालुका म्हणून ओळख आहे. मार्च ते जून या काळात इतरत्र हाहाकार निर्माण झाला असताना पाटोदा तालुक्यात मात्र एकही रुग्ण नव्हता. अर्थात पुणे-मुंबई याठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालेले नागरिक आपापल्या गावी पोहोचल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत कमीच. अर्थात या कोरोना काळात प्रत्येक व्यक्ती शेवटचा विचार करत असल्याने या काळात कोण आपला? कोण जवळचा? हेही स्पष्ट झाले
.
या कोरोना काळात ऊस तोडणीसाठी साखर कारखान्यावर गेलेले मजूर आपापल्या गावी परतत असताना पुणे जिल्ह्यातील एका टोलनाक्यावर रात्रीच्या वेळी आष्टी, पाटोदा, बीड येथील मजुरांना पोलिसांनी अडविण्यात आल्यानंतर या मजुरांच्या मदतीसाठी आमदार सुरेश धस रात्रीच्या वेळी धावून आले. त्यानंतर त्यांच्यावर जिल्हा बंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर याच कोरोनाच्या काळात ऊस तोडणी व वाहतूक दरात वाढ मिळावी यासाठी आमदार सुरेश धस यांनी राज्यभर दौरा करून ऊसतोड मजूर मुकादम व वाहतूकदार यांच्यासाठी राज्यभर लढा उभारल्याने वर्षभरात कोरोनाबरोबर आ. सुरेश धस चर्चेत राहिले.
कोरोना संसर्गाच्या काळात दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या पाटोदा तालुक्यात यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला झाल्याने खरिपाची पिके चांगली आली मात्र काढणीच्या वेळेस सततच्या पावसामुळे पिके वाया गेली. मात्र नुकसान झालेल्या पिकांची जिल्ह्यातील इतर तालुक्यात भरपाई मिळाली असताना व तहसील प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली नाही तसेच खरिपाचा पीक विमाही मिळण्याची शक्यता बारगळली आहे.