मौखिक निरीक्षणावरून राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये कोरोनाबाधिताचे शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:39+5:302021-05-22T04:31:39+5:30

सोमनाथ खताळ बीड : संसर्ग वाढण्याच्या भीतीने मयत कोरोनाबाधित रुग्णाची चिरफाड न करता शवविच्छेदन करावे, अशी सूचना आयसीएमआरने (इंडियन ...

Coronary autopsy in Beed for the first time in the state from oral observation | मौखिक निरीक्षणावरून राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये कोरोनाबाधिताचे शवविच्छेदन

मौखिक निरीक्षणावरून राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये कोरोनाबाधिताचे शवविच्छेदन

Next

सोमनाथ खताळ

बीड : संसर्ग वाढण्याच्या भीतीने मयत कोरोनाबाधित रुग्णाची चिरफाड न करता शवविच्छेदन करावे, अशी सूचना आयसीएमआरने (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) केली होती. त्याप्रमाणे बीडमध्ये आत्महत्या केलेल्या कोरोनाबाधिताचे मौखिक निरीक्षणाद्वारे शवविच्छेदन झाले आहे. अशी घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच नोंदविल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास शवविच्छेदन न करता थेट अंत्यसंस्कार केले जातात. आयसीएमआरच्या देखील थेट शवविच्छेदन टाळण्याच्या सूचना आहेत. मात्र, शुक्रवारी बीडच्या जिल्हा रुग्णालयात असाच एक कठीण प्रसंग उद्भवला. शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असताना एकाने आत्महत्या केली. त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर पंचनामा करून अहवाल देण्याची विनंती बीड शहर पोलिसांनी जिल्हा रुग्णालयाला केली होती. पण, शवविच्छेदन करावे की नाही, यावर विचार झाला. महाराष्ट्रात यापूर्वी कोठेच असे शवविच्छेदन झालेले नसल्यामुळे नेमके काय करावे, असा प्रश्न होता. अखेर आयसीएमआरच्या सुधारित निर्देशांप्रमाणे मृतदेहाचे विच्छेदन डॉ. गिरीश गुट्टे यांच्या मार्गदर्शनात डॉ. फरिदा यांनी केले.

आयसीएमआर निर्देश सांगतात...

आयसीएमआरने कोरोनाग्रस्तांच्या शवविच्छेदनासंदर्भाने निर्देश जारी केलेले आहेत. यात कोरोनाग्रस्तांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला तर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याने त्याला मयत घोषित करून उपचाराच्या कागदपत्राआधारे मृत्यूचे कारण द्यायचे आहे. मात्र अपघात, आत्महत्या अशा न्यायवैद्यक प्रकरणात शवविच्छेदन अहवाल आवश्यकच असेल तर शक्यतो शवविच्छेदन टाळावे आणि करावेच लागले तर पोलिसांनी मृतदेहाचे वेगवेगळ्या अंगाने काढलेले फोटो पाठवावेत, त्या फोटोंचे आणि मृतदेहाचे बाह्य निरीक्षण करून आणि मयत व्यक्तीसंदर्भाने वैद्यकीय उपचार, मृत्यूवेळची शारीरिक परिस्थिती याची माहिती घेऊन त्यावरून मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा शवविच्छेदन अहवाल द्यावा, असे सांगितले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत मृतदेहाची चिरफाड करू नये, असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार

जगात यापूर्वी जर्मनीने काही कोरोनाग्रस्त मृतदेहांचे विच्छेदन केले होते. त्यानंतर भारतात बंगळुरू येथे डॉ. दिनेश राव यांनी ऑक्टोबर २०२०मध्ये एका कोरोनाग्रस्त मृतदेहाचे विच्छेदन केले होते. त्यावेळी कोरोनाचे विषाणू मृतदेहाच्या तोंडात १४ ते १८ तास राहतात, असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. त्यामुळे पुन्हा कोणी शवविच्छेदन केलेले नव्हते. आजचे मौखिक शवविच्छेदन हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार आहे.

Web Title: Coronary autopsy in Beed for the first time in the state from oral observation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.