कोरोनाचे बंधन सुटले आता रक्षाबंधन......
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:48+5:302021-08-22T04:35:48+5:30
बीड : कोरोनाच्या बंधनातून मुक्त झालेल्या बाजारपेठेत रक्षाबंधनासाठी लाडक्या भाऊरायाला राखी व गिफ्ट खरेदीसाठी बहिणींची तीन दिवसांपासून वर्दळ दिसत ...
बीड : कोरोनाच्या बंधनातून मुक्त झालेल्या बाजारपेठेत रक्षाबंधनासाठी लाडक्या भाऊरायाला राखी व गिफ्ट खरेदीसाठी बहिणींची तीन दिवसांपासून वर्दळ दिसत आहे. गतवर्षीप्रमाणे पावसाने काहीशी ओढ दिली असलीतरी सणानिमित्त खरेदीचा ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मागील वर्षी कोरोनामुळे बाजारपेठेत उत्साह कमी जाणवला; मात्र यंदा निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल केल्याने लोक खरेदीसाठी घराबाहेर पडताना दिसतात. शहरातील सुभाष रोड, डीपी रोड, माळीवेस धोंडिपुरा, मंडई भागात राख्यांची दुकाने सजली असून एक रुपयापासून ३०० रुपयांपर्यंत राख्या दुकानांमध्ये पाहायला मिळाल्या.
चमकी, स्पंज आणि वेलवेटच्या राख्या हद्दपार झाल्या असून अमेरिकन डायमंड, रंगीत स्टोन, मोती, आकर्षक मणी, रुद्राक्ष, डायमंड, मोती, इमिटेशन ज्वेलरीमधील चैन, पदकांच्या परंतु नाजूक राख्यांना चांगली मागणी आहे. ब्रासलेट राखी, चांदीसह व्हाईट मेटल, कॉपरच्या राख्या आकर्षित करीत आहेत. घुंगरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क, कुंदन वर्क असलेल्या राख्यांची खरेदी उत्साहाने होत असल्याचे पाहायला मिळाले. बच्चे कंपनीसाठी छोटा भीम, कृष्णा यासह म्युझिक व लाईट असलेल्या असंख्य प्रकारच्या राख्या उपलब्ध आहेत. तीन वर्षांपासून स्पिनरची राखी लहान मुलांमध्ये आवडती ठरली आहे.
-------
हॅण्डमेड राख्यांनादेखील भगिनींची पसंती आहे. राखी तयार करण्यासाठी लागणारे मणी, मोती, विविध आकारातील आकर्षक पॅच, कुंदन, खडे, घुंगरू, रंगीत दोरे, गम स्टीक येथील बाजारात उपलब्ध असल्याने अनेक भगिनी स्वत: राखी बनविण्यावर भर देत असून पंधरा दिवसांपासून राखीचे सुटे भाग खरेदीचे प्रमाण वाढल्याचे व्यापारी नसीर अन्सारी यांनी सांगितले.
---------
कोरोनामुळे सगळीकडे वातावरण बिघडले होते. बाजारपेठही सुस्त होती, परंतु सणाच्या निमित्ताने राखी, गिफ्ट, सौंदर्य प्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी खरेदीसाठी तीन- चार दिवसांपासून चांगली वर्दळ आहे. -- श्रवणकुमार भाटी, व्यापारी.
--------
सणानिमित्त साड्या खरेदीचा ओघ वाढला आहे. टी. व्ही. सिरियल तसेच सोशल मीडियावर पाहिलेल्या विविध डिझायनर तसेच नव्या ट्रेंडच्या फॅन्सी साड्यांना मागणी आहे. दोनशे रुपयांपासून घ्याव्या तशा आकर्षक साड्या महिला खरेदी करतात. -- सुनील पारख, व्यापारी बीड.
-------------