कोरोनाचा कहर ! अंबाजोगाईत दर दोन तासाला पेटतंय सरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 08:03 PM2021-04-17T20:03:31+5:302021-04-17T20:05:29+5:30
Corona death toll rises in Beed दोन दिवसात अंबाजोगाईत २४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला असून विशेषतः अंबाजोगाई तालुक्यात अधिक प्रादुर्भाव आहे. वाढत्या रुग्णसंख्ये सोबतच मृतांची संख्याही वाढता असल्याने भयावह परिस्थिती आहे. शुक्रवार आणि शनिवार या दोनच दिवसात अंबाजोगाईत कोरोनामुळे मृत झालेल्या २४ रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे. बीड जिल्ह्यात दररोज हजारांपेक्षाही अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. शनिवारी तर जिल्ह्यात विक्रमी १२११ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन झाले. यातील ३३७ एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील आहेत. सध्या अंबाजोगाईतील स्वाराती आणि लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये मिळून हजार पेक्षाही अधिक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. तर, शेकडो रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. दररोज शेकडो रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याचे चित्र दिलासादायी असले तरी दुसऱ्या लाटेतील मृत्यूंची आकडेवारी मात्र चिंतेत भर घालणारी आहे. शुक्रवारी आणि शनिवार प्रत्येकी १२ असे दोनच दिवसात एकूण २४ मृतदेहांवर अंबाजोगाई नगर पालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
आजूबाजूच्या तालुक्यातील रुग्णांचा ओढा अंबाजोगाईकडे
शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण अंबाजोगाईचे स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. हि दोन्ही ठिकाणी कोविड रुग्णांनी खचाखच भरली आहेत. दरम्यान, या ठिकाणी कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्काराची जबाबदारी अंबाजोगाई नगर पालिकेची आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणारे मृत हे एकट्या अंबाजोगाई तालुक्यातील नसून त्यापैकी अनेकजण आसपासच्या तालुक्यातील रहिवासी असतात असे संबंधितांनी सांगितले.