लसीकरण केंद्रच ठरणार कोरोनाचे हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:34+5:302021-05-08T04:35:34+5:30
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अगोदरच मोठ्या प्रमाणावर कोरोनाने विळखा घातला असून, त्यात आता लसीकरणही डोकेदुखी ठरत आहे. ...
अंबाजोगाई : बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अगोदरच मोठ्या प्रमाणावर कोरोनाने विळखा घातला असून, त्यात आता लसीकरणही डोकेदुखी ठरत आहे. ठीकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी होणारी गर्दी ‘सुपरस्प्रेडर’ ठरल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा प्रशासनाने गर्दीचे नियोजन करण्याची अत्यंत गरज आहे. लसीचा पहिला डोस वेगळ्या ठिकाणी ठेवावा आणि दुसरा डोस स्वतंत्र वेगळ्या ठिकाणी ठेवून लसीकरण केंद्र वाढवणे काळाची गरज आहे; अन्यथा बाधित रुग्णांचा डब्लिंग रेट होऊ शकतो तेव्हा वेगळ्या परिणामाला सामोरे जावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यात वाढता कोरोना थांबता थांबेना, रोज दीड हजाराच्या आसपास नवीन रुग्ण निघतात. बारा हजार ॲक्टिव्ह रुग्ण जिल्ह्यात आहेत. रुग्णांना अपुरे बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनचे संकट असताना दुसऱ्या बाजूने लसीकरणामध्ये अनेक गोंधळ पुढे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात अगोदरच या संकटाने धुमाकूळ घातला असून, शहरापेक्षा नाही म्हटले तरी ८०% रुग्ण ग्रामीण भागात आहेत. प्रशासनासमोर फार मोठे आव्हान असून, अगोदर ग्रामीण भाग काबूत आणणे महत्त्वाचे आहे. त्यातच जनजागृती मोठ्या प्रमाणावर झाल्याने ग्रामीण भागात लसीकरणावर लोकांचा जास्त भर वाढला आहे. लसींचा असलेला तुटवडा आणि लस केंद्रांची कमतरता ही खऱ्या अर्थाने आता वेगळ्या संकटाला तोंड दिल्याशिवाय राहणार नाही. पन्नास हजार लसींचे डोस आल्यानंतर जवळपास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय लसीकरण सुरू झाले. उपलब्ध लसींची संख्या मात्र कमी, त्यामुळे प्रत्येकाला लस घेण्याची घाई झाली आहे. ग्रामीण असो की शहरी भागात ही लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली असून, रांगा लागत आहेत. या गर्दीचे नियोजन अगोदर करणे महत्त्वाचे आहे. शिवाय केंद्रावर लसीकरण एवढ्या लोकांचे होईल, अशाप्रकारची जनजागृती करून लोकांना संदेश देणे महत्त्वाचे आहे.
-----
लोक फिजिकल डिस्टन्स पाळत नाहीत, त्यालाही प्रशासनाने नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे; अन्यथा लस घेणे हा भाग महत्त्वाचा असला तरी लसीमुळे कोरोनाबाधित संख्या अधिक वाढू शकते. तसं झालं तर फार मोठ्या परिणामाला बीड जिल्ह्यातील जनतेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने लसीकरण केंद्राची संख्या वाढून गर्दी आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे.
--------
मध्यंतरी लस पुरवठ्यात अनियमितता निर्माण झाल्याने अनेकांचे लसीकरण रखडले होते. आता लस पुरवठा सुरू झाल्याने गर्दी वाढली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. - डॉ. बालासाहेब लोमटे, तालुका आरोग्य अधिकारी, अंबाजोगाई