कोरोनाच्या रुग्णास मिळाला पुनर्जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:32 AM2021-05-16T04:32:42+5:302021-05-16T04:32:42+5:30
अंबाजोगाई : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीम अतिशय परिश्रम घेत असल्याची ...
अंबाजोगाई : येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीम अतिशय परिश्रम घेत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. असेच एक आश्चर्यचकित करणारे उदाहरण आहे मेघराज चौधरी या रुग्णाचे. मेघराजवर उपचार चालू असताना त्याची ऑक्सिजन पातळी कमालीची घसरून ४० पर्यंत आली होती. मात्र, या परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वारातीच्या वैद्यकीय टीमने त्याची ऑक्सिजन पातळी ९६ वर आणून त्याला नवे जीवनदान मिळवून दिले. शनिवारी त्याला सुखरूप घरी सोडण्यात आले. कोविड रुग्णांवर उपचार करताना ही चमत्कार दर्शवणारी घटना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात घडली आहे.
शहरातील मोची गल्ली विभागात राहणारे व येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लिपीक असलेले मेघराज प्रयागराम चौधरी यांना १० एप्रिल रोजी उपचारासाठी कोविड युनिट ३ मध्ये दाखल केले होते. या ठिकाणी मेघराज यांच्यावर उपचार चालू असताना त्यांची ऑक्सिजन पातळी खाली जात जात एकदम ४० पर्यंत उतरली. मेघराज यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याचे लक्षात येताच त्याला व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या वॉर्ड क्र.१७ मध्ये शिफ्ट केले. याठिकाणी मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज याच्यावर डॉ. सचिन चौधरी, डॉ. अनिल मस्के, डॉ. विश्वजित पवार, डॉ. विशाल लंगे, डॉ. इरा ढमढेरे, डॉ. अक्षय अंबेकर, डॉ. अस्मिता, डॉ. शुभम, डॉ. नवीन सायनी, डॉ. मस्तकीन शेख, डॉ. अभिषेक शर्मा यांनी उपचार सुरू केले. मेघराज यांची ऑक्सिजन पातळी आता ९६ च्या पुढे सरकल्यानंतर शनिवारी रितसर त्याला डिस्चार्ज देवून सुखरूप घरी सोडण्यात आले आहे. मेघराज यांना पुनर्जन्म दिल्याबद्दल चौधरी परिवाराने स्वारातीच्या सर्व डॉक्टर टीमचे ऋण मानले आहेत.
बारा दिवस मृत्यूशी झुंज
मेघराज हे सलग दहा ते बारा दिवस व्हेंटिलेटरवर उपचार घेत होते. या उपचार कालावधीत अनेक वेळा मेघराज अत्यवस्थ होऊन परत नॉर्मल झाले आणि हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली. बारा दिवस व्हेंटिलेटरवर असणारे मेघराज स्थिर झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन पातळी नॉर्मल होण्यासाठी परत आठ दिवस ऑक्सिजनवर ठेवून उपचार करण्यात आले. ऑक्सिजन पातळी ४० वर गेलेली असतांना त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्याचा चमत्कार स्वारातीच्या कोविड हॉस्पिटलमध्ये घडला आहे.
===Photopath===
150521\avinash mudegaonkar_img-20210515-wa0007_14.jpg