कोरोनाची नियमावली धाब्यावर; कारवाईला ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:46+5:302021-06-30T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : जीवघेण्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच शहरात मोठ्या धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : जीवघेण्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत नाही तोच शहरात मोठ्या धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन केले जात आहे. आनंद उत्साहाच्या भरात लग्न सोहळ्यांमध्ये कोरोनाच्या नियमांना पायदळी तुडविले जात असताना पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाकडून कारवाईला ‘खो’ दिला जात असल्याचे चित्र आहे. कारवाई होत नसल्यामुळे अंबाजोगाईकर गाफील आहेत. अद्यापही कोरोना संपला नाही. याचे भान नागरिकांसह सुस्तावलेल्या प्रशासकीय यंत्रणेने ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांच्या मृत्यूची संख्या जास्त होती. या लाटेत अनेकांच्या संसाराची घडी कोलमडली. कोरोना बाधितांच्या संख्येचा आलेख वाढता असल्यामुळे फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत शहरातील रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली होती. रेमडेसिविरसह ब्लॅक फंगसच्या औषधींसाठी रुग्णांच्या नातेवाइकांवर अक्षरश: पायपीट करण्याची पाळी ओढवली होती. मे महिन्याच्या अखेरपासून ही लाट ओसरली. मागील काही दिवसांपासून बोटांवर मोजण्याइतपत रुग्णसंख्या आढळून येत असल्याचे पाहून अंबाजोगाई शहर व परिसरात धूमधडाक्यात लग्न सोहळ्यांचे आयोजन करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यादरम्यान, कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची व प्रादुर्भावाची शक्यता बळावली आहे.
...
शहरवासीयांनी काळजी घ्यावी
कोरोनाचा प्रादवर्भाव अद्यापही संपला नाही, याचे भान ठेवण्याची गरज आहे. लग्न सोहळ्यात तसेच इतर कार्यक्रमात लहान मुलांच्या आरोग्याला जपण्याची नितांत आवश्यकता असताना तसे होत नसल्याचे चित्र आहे. कार्यक्रमांचे आयोजन करताना नियमांचे पालन करून कुटुंबीयांची काळजी घेण्याची अपेक्षा आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे.
...
सार्वजनिक कार्यक्रमांवर ‘वॉच’ नाहीच
कोरोना विषाणूच्या अनुषंगाने लग्न सोहळ्यासह इतर कार्यक्रमांना मर्यादित उपस्थितीमध्ये प्रशासनाकडून परवानगी दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचा ‘वॉच’ नसल्यामुळे नागरिक बेफिकीर झाले आहेत.
...
केवळ ५० जणांच्या विवाहास परवानगी
शासनाच्या नवीन आदेशानुसार विवाह सोहळ्यास वधू-वरांकडील ५० जणांनाच विवाह समारंभात उपस्थित राहता येईल. त्या ५० जणांची यादी व कोरोना टेस्ट संबंधित पोलीस ठाण्यात देणे क्रमप्राप्त करण्यात आले आहे.
....