नांदेवली गावाला कोरोनाचा विळखा, दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:52+5:302021-05-06T04:35:52+5:30
बाधितांचा मुक्त संचार शिरूर कासार : तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी हजार-अकराशे लोकवस्ती असलेल्या नांदेवली ...
बाधितांचा मुक्त संचार
शिरूर कासार : तालुक्यातील श्रीक्षेत्र मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी हजार-अकराशे लोकवस्ती असलेल्या नांदेवली गावाला कोरोना महामारीने घट्ट विळखा घातला असून शंभरावर बाधित रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला. देखील या गावाकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गृहविलगीकरणात असलेल्यांचा मुक्त संचार साखळी तोडण्यासाठी अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. नांदेवली या छोट्याशा गावांत आतापर्यंत १२० बाधित निघाले असून काही कुटुंबातील सर्वच सदस्यांचा समावेश असल्याने कुणी कुणाकडे लक्ष द्यायचे, असा प्रश्न आहे. शिवाय ५० ते ६० बाधित वेगवेगळ्या सेंटरवर असून काही गृहविलगीकरणात असले तरी त्यांचा गावात मुक्त संचार संसर्ग वाढवतो आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असताना दुर्लक्ष होत आहे. असेच चालत राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका नाकारता येत नाही.
सरपंच ओमप्रकाश जोजारे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असता टेस्टिंगसाठी डॉ. विशाल मुळे यांनी कॅप लावला. शंभर जणांच्या तपासणीत जवळपास ३५ रुग्ण बाधित निघाले होते. नियंत्रण मिळवण्यासाठी व जवळच सोय होण्याच्या दृष्टीने नांदेवली फाट्यावर असलेल्या शाळेत सेंटर सुरू करून त्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी होत आहे.