CoronaVirus : कोणीही यावे ओळखपत्र घ्यावे, माजलगाव नगरपालिकेतुन शेकडो पासचे वाटप ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 05:53 PM2020-04-01T17:53:53+5:302020-04-01T17:56:03+5:30
अत्यावश्यक सेवेच्या पासचा होत आहे गैरवापर
माजलगाव : शहरात कोरोना मुळे कर्मचाऱ्यांना ज्या-त्या कार्यालयाने पास दिल्या असून अत्यावश्यक सेवा देणा-यांना पोलीसांमार्फत पास दिल्या गेल्या आहेत. मात्र नगर पालिकेतुन कर्मचाऱ्यांना सोडुन बाहेरील लोकांना शेकडो पास दिल्या असल्याने ते लोक याचा गैरवापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत असतांना प्रभारी मुख्याधिकारी यांना या बाबतची भनकही नाही.
बीड जिल्ह्यातील दोन-अडीच तासाचे संचारबंदी शिथिल वगळता एकवीस दिवस संचारबंदी राहणार आहे. या संचार बंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना पोलिसांनी पास दिल्या असून ते या पासवर अत्यावश्यक सेवा देत असून त्यांना या पासवर पेट्रोल देखील मिळत आहे. या संचार बंदीच्या काळात अनेक कार्यालयाचे कर्मचारी पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करत असून ज्या त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात कडून देण्यात आलेले ओळखपत्र किंवा पास यावर त्यांचा वावर सुरू आहे. त्याचप्रमाणे शहरात नगरपालिकेतील कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत.
याचाच काही कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेण्याचे ठरवले असून अनेक कर्मचाऱ्यांनी आपली मित्र कंपनी , नातेवाईक , अनेक नगरसेवकांचे हितचिंतकांना नगरपालिकेतुन पासचे वाटप करण्यात आले असुन ते ही बोगस पास गळ्यात अडकवुन दिवसभर बाहेर फिरताना दिसत असुन हेच लोक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गाडया घेऊन पेट्रोल भरताना सर्वात पुढे दिसुन येत आहेत. यामुळे आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल मिळत नसल्याचे चित्र सध्या शहरात पहावयास मिळत आहे.
सध्या माजलगाव नगरपालिकेचा कारभार रामभरोसे सुरू असून नगराध्यक्ष जवळपास एक महिन्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत आहेत. तर मागील तीन महिन्यांपासून प्रभारी मुख्याधिका-यांंवर सुरू असून महिन्या पंधरा दिवसाला कुठल्या तरी एका जनाकडे मुख्याधिकारी पदाचा चार्ज दिला जातो,तसेच कोणीच मुख्याधिकारी आठवड्यातून एक-दोन दिवस वगळता याठिकाणी थांबण्यास तयार नाही. याचा फायदा अनेक कर्मचाऱ्यांनी उचलण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या सर्व बोगस पास एका नगरसेवकाच्या घरी बसुन वाटप केल्या जात असुन या पाससाठी 300-500 रूपये घेतले जात असल्याचे नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
बोगस सह्या केल्या
माझ्याच बोगस सहया केल्या , पोलिसांना कळवले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेतुन अनेकांना बोगस पास वाटप करण्यात आली असल्याची माहिती मला मिळाली असून यात अनेक पासवर माझ्या बोगस सह्या देखील केल्या गेल्या असुन याबाबत मी बैठकीत पोलिसांना याबाबत माहिती देखील दिली आहे
-- गणेश डोंगरे , कार्यालयीन अधिक्षक, नगरपालिका
कारवाई करण्यात येईल
या बोगस पास बाबत मला माहिती नसुन या बाबत माहिती घेतली जाईल. असा प्रकार झाला असल्यास संबंधीत दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
---भागवत बिघोत , प्रभारी मुख्याधिकारी