CoronaVirus : प्रशासन ‘पॉझिटिव्ह’,कोरोना ‘निगेटिव्ह’; योग्य नियोजनाचा बीड जिल्ह्याला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 01:30 PM2020-04-17T13:30:06+5:302020-04-17T13:33:37+5:30
प्रशासनाने ‘पॉझिटिव्ह’ राहून केलेले योग्य नियोजन आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळेच जिल्हा कोरोना ‘निगेटिव्ह’ राहिला आहे.
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनास हरविण्यात आतापर्यंत तरी बीड जिल्हा सरस राहिला आहे. आतापर्यंत पाठविलेले सर्व १४१ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कोरोनाग्रस्ताची नोंदही अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे बीडची पाटी कोरीच आहे. प्रशासनाने ‘पॉझिटिव्ह’ राहून केलेले योग्य नियोजन आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळेच जिल्हा कोरोना ‘निगेटिव्ह’ राहिला आहे.
कोरोना विषाणूने भारतात पाय पसरायला सुरूवात करताच इकडे बीडची यंत्रणा सतर्क झाली होती. शहरी, ग्रामीण डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बोलावून घेत प्रशिक्षण दिले. त्यांना मार्गदर्शन करून आधार दिला. त्यानंतर जर कोणी संशयीत रुग्ण आलाच तर त्यांच्यासाठी सुरूवातील जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र २५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला. कोरोनाची गंभीरता लक्षात घेता अंबाजोगाईतही स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार केला. सध्या बीड जिल्ह्यात २०० खाट रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांसह, परिचारीका, कक्ष सेवकांची नियूक्तीही केली आहे.
शहरीपाठोपाठ ग्रामीण आरोग्य यंत्रणाही सतर्क आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्येही कोव्हीड १९ आजारांची लक्षणे दिसताच त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले जात आहे. आतापर्यंत बीडमध्ये १०१ तर अंबाजोगाईत ४१ लोकांना दाखल केले होते. या सर्वांचे स्वॅब घेतले असता सर्वच निगेटिव्ह आलेले आहेत. बीडमधून गेलेला एकही स्वॅब सुदैवाने पॉझिटिव्ह आलेला नाही. त्यामुळे आतापर्यंत नशीबाने बीडकरांची साथ दिल्याचे दिसत आहे.
कोरोनाग्रस्ताची नोंद नगरला; म्हणून बीडची पाटी कोरीच
आष्टी तालुक्यातील कोरोनाग्रस्ताला अहमनगरमध्येच आजाराची लागन झाली होती. त्याला सुरूवातीपासूनच नगरमध्ये दाखल केलेले आहे. सध्याही त्याच्यावर तेथेच उपचार सुरू आहेत. त्यामुळे याची नोंदही तिकडेच आहे. हा कोरोनाग्रस्त केवळ बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे. आणि हा एकमेव कोरोनाग्रस्त असल्याची नोंद बीडमध्ये आहे.
या अधिकाऱ्यांचे समन्वय अन् विचाराने काम
सुरूवातीपासूनच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार हे पाच अधिकारी समन्वय अन् विचाराने काम करीत आहेत. बैठका, सुचना आणि मार्गदर्शनात ही अधिकारी कमी पडलेले नाहीत. त्यांना महसूल, शिक्षण, आरोग्य, पोलीस, पालिका, पंचायत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांनी पूर्णपणे सहकार्य केले आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्याची पाटी कोरी आहे.
पिंपळासह परिसरात ३० पथकांचा मुक्काम
पिंपळा येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला. त्यानंतर पिंपळासह परिसरातील ११ गावे बंद करून दररोज अडीच हजार घरांमधील १३ हजार लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यांना काही लक्षणे आहेत का, याची माहिती घेतली जात आहे. यासाठी ३० पथके नियमित कर्तव्य बजावत आहेत. हा भाग डेंजर झोनमध्ये असतानाही जवळपास १५० अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत.
बाहेरून आलेल्यांची नोंद करून ‘क्वारंटाईन’
१ मार्चपासूनच बाहेर जिल्ह्यातून, विदेशातून आलेल्यांची नोंद घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे. दोन टप्यात केलेल्या सर्वेक्षणातून जवळपास दीड लाख लोकांची नोंद करण्यात आली. ज्यांना आजार किंवा लक्षणे आहेत, अशांची नोंद करून तपासणी व औषधोपचार केले. तसेच काहींना होम क्वारंटाईन केले तर काहींना इन्टीट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. याची दररोज नोंद घेतली जात आहे.
एक आदेश पोहचेपर्यंत पडतो दुसरा आदेश
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत व्हिडीओ कॉन्फरंन्स, बैठका घेतल्या जात आहेत. सर्व वरिष्ठ अधिकारी यातच कायम व्यस्त असतात. वरिष्ठांकडून आलेल्या सुचना शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाहीत, तोच पुन्हा नवा आदेश येत आहे. दिवसभर बैठकांना बसून आणि घेऊनच सर्व वेळ जात असल्याचे सांगण्यात आले.