coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 08:19 PM2020-07-29T20:19:56+5:302020-07-29T20:22:34+5:30
शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला.
बीड : शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका व्यक्तीचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याला संपर्क केला असता त्याने आपण स्वॅबच दिला नसल्याचे सांगितले. स्वॅब नाही आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? हे ऐकून आरोग्य विभागाची झोपच उडाली. खात्री करण्यासाठी सर्वच घामाघुम झाले. पूर्ण रात्र तपासणी केल्यावर त्याने स्वॅब दिल्याची कबुली दिली. पहाटेच्या सुमारास ही तारांबळ थांबली आणि अधिकाऱ्यांनी घामच पुसला.
शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला. त्याचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. शिरूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी यांनी त्या रुग्णाला संपर्क केला. तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आपण रुग्णालयात दाखल व्हा, असे सांगितले. यावर त्या रुग्णाने आपण स्वॅबच दिला नाही तर रिपोर्ट पॉझिटिव्ह कसा? असा उलट प्रश्न केला. याची खात्री करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली. काही अधिकारी त्याची विनवणी करून खरे बोलण्यासाठी सांगत होते. परंतु तो आपण स्वॅब दिलाच नाही, या मतावर ठाम होता. इकडे काही अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात स्वॅबची खात्री केली. त्यात त्याने स्वॅब दिल्याचे स्पष्ट झाले. तर दुसऱ्या बाजूला गावातील सरपंचालाही संपर्क करून माहिती दिली. सरपंचाने या रुग्णाशी संपर्क केल्यावर त्याने आपण स्वॅब दिल्याची कबुली दिली. सदरील सरपंचाने ही माहिती आरोग्य विभागाला दिली आणि सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. रात्री १० वाजता सुरू झालेला हा तपास पहाटेच्या सुमारास संपला.
खोटी माहिती देण्याचे प्रकार वाढले
स्वॅब घेतलेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला तात्काळ नियंत्रण कक्षातून संपर्क केला जातो. यावर काही लोक खोटी माहिती देणे, दिशाभूल करण्याचे प्रकार करीत आहेत. असाच प्रकार शिरूरमधील बोरगावच्या रुग्णाने केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणे गरजेचे आहे.
बोरगावच्या रुग्णाला अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले. यावर त्याने स्वॅबच दिला नसल्याचे सांगितल्याने तारांबळ झाली. खात्री केल्यानंतर त्याने स्वॅब दिल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्या रुग्णानेही कबुली दिली.
- डॉ.अशोक गवळी, तालुका आरोग्य अधिकारी, शिरुर