CoronaVirus : 'दारू ऑन डिमांड'; देशी दारूची 'होम डिलिव्हरी करणारे चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 04:00 PM2020-04-02T16:00:46+5:302020-04-02T16:02:05+5:30
माजलगावात तालुक्यातील तालखेड येथून घेतले ताब्यात
माजलगाव : तालुक्यातील तालखेड येथे दुचाकीवरून घरपोच देशी दारुची विक्री करणाऱ्या चार जणांना माजलगाव ग्रामीण पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिसांनी ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.
तालखेड येथे जिल्हाधिकारी यांच्या आस्थापना बंदच्या आदेशाचे उल्लंघन करुन देशी दारुची घरपोच विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. यावरून बुधवारी राञी 10 वाजता माजलगाव ग्रामीण पोलिसांच्या गस्तीपथकाने तालखेडच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात दोन दुचाकीवरील चौघे जणांना ताब्यात घेतले. गणेश भागवत नरवडे(19),बळीराम हनुमान शिंदे (20) ( दोघे रा.पिंपळनेर ता.बीड ) हे दुचाकी ( क्र.23 ए.एच 0170) व महेश विष्णू नरवडे (20),कोंडीबा तुळशीराम नरवडे (29) ( दोघे रा.पिंपळनेर ता.बीड ) हे दुचाकी ( क्र.एम.एच.23एस 0726 ) वर देशी दारुची घरपोच विक्रीसाठी जात असतांना ताब्यात घेतले. हे युवक फोनवरून मागणी घेऊन दुकान उघडून विक्रीसाठी दारु घेऊन जात. यावेळी पोलीसांनी 54 हजार 984 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके हे करीत आहेत.