Coronavirus : बीडमध्ये आष्टीचा पत्रकार व अंमळनेरच्या पोलिसाला बाधा; एकूण रुग्णसंख्या २१३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:19 PM2020-07-11T12:19:35+5:302020-07-11T12:19:35+5:30
अंमळनेर ठाण्यातील एक ४५ वर्षीय कर्मचारी पाटोदा तालुक्यातील हातोला येथील चेकपोस्टवर कर्तव्यावर होता.
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढत चालला आहे. शुक्रवारी २० जण पॉझिटिव्ह आले. यात पाटोदा तालुक्यातील अंमळनेर ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह आष्टी येथील एका पत्रकाराचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१३ झाली आहे. दरम्यान, कोरोनाने बाधा केलेला हा पहिला पोलीस असणार आहे.
अंमळनेर ठाण्यातील एक ४५ वर्षीय कर्मचारी पाटोदा तालुक्यातील हातोला येथील चेकपोस्टवर कर्तव्यावर होता. मागील तीन दिवसांपासून त्याला लक्षणे जाणवत होती. वैद्यकीय अधिकारी डॉ.परमेश्वर बडे यांनी तपासणी करून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एल.आर.तांदळे यांना माहिती दिली. गुरूवारी रात्री स्वॅब घेतल्यानंतर शनिवारी पहाटे त्याचा अहवाल आला. यात तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच जिल्ह्यात बीड शहर व तालुक्यात ८, परळीत ४, गेवराई ६ आणि धारूर व आष्टीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. या २० रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या दोनशेपार गेली आहे. पैकी ११९ कोरोनामुक्त झालेले असून ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान, पोलिसाच्या संपर्कातील अधिकारी, कर्मचा-यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच आरोग्य विभागाकडून सर्र्वेक्षण सुरू केले आहे. डॉ.तांदळे, डॉ.बडे यांनी आढावा घेऊन सुचना केल्या आहेत. तर अपर अधीक्षक विजय कबाडे यांनी सपोनि श्यामकुमार डोंगरे यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह इतर सुचना केल्या आहेत.