CoronaVirus : 'बाबांनो, वेळेवर जेवण-पाणी घ्या'; बीडच्या डीएचओंची सहकारी, कर्मचाऱ्यांना भावनिक साद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 12:49 PM2020-04-28T12:49:24+5:302020-04-28T12:50:03+5:30
डोक्यावर सुती कापडा अन् सोबत पाण्याची बाटली ठेवून काम करा
- सोमनाथ खताळ
बीड : कोरोनाविरूद्ध लढा देण्यात आतापर्यंत आपण यशस्वी झालो आहोत. परंतू ही लढाई इथेच संपली नाही. आणखी लांबचा पल्ला गाठायचा आहे. हे करताना स्वता:ची काळजी घ्या. वेळेवर जेवण करा, उनातून बचावासाठी डोक्यावर सुती कापडा आणि सोबत पाण्याची बाटली ठेवा. असा भावनिक संदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य विभागातील शिपाई ते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाºयांपर्यंतच्या अधिकारी, कर्मचाºयांना दिला आहे.
बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. गावपातळीवर केली जात असलेली जनजागृती, बाहेरून आलेल्या लोकांची नोंदणी, चौकशी यासारखे नियोजन केले जात आहे. आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, परिचारीका, आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी, सीएचओ, तालुका आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी हे सर्वच लोक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. जीव धोक्यात घालून दिवसरात्र कोरोनाशी लढा देत आहेत. आतापर्यंत या लढ्याला यशही आले आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, परभणी, लातूर, हिंगाली, जालना, जामखेड या बाजूच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. परंतु या कोरोनाला सिमेवरच रोखण्यात बीड प्रशासनाला यश आलेले आहे. पोलीस, आरोग्य, कृषी, महसूल, शिक्षण असे सर्वच विभाग जीव ओतून काम करीत आहेत.
दरम्यान, मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या लढ्यात आरोग्य कर्मचाºयांचे काम कौतुकास्पद आहे. आणखी आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे खचून जावू नका. स्वता:ची काळजी घ्या, सोशल डिस्टन्सींग ठेवून कर्तव्य बजवा, तोंडाला मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, जास्त संपर्कात येऊ नका, गर्दीत जावू नका, उन खुप असल्यामुळे डोक्यावर सुती कापडा घ्या. संतूलीत आहार आणि कर्तव्यावर जाताना सोबत पाण्याची बाटलीही असूद्या. अवश्यकता भासल्यास ओआरएस सोबत राहूद्या, असा संदेश सर्वांना देत डॉ.पवार यांनी आपल्या सहकाºयांसह कर्मचाºयांना प्रोत्साहन दिले आहे. या भावनिक संदेशामुळे अधिकारी, कर्मचारी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मी तर काम करतोच. परंतु ग्राऊंड लेव्हलवर काम करणारा शेवटचा कर्मचारीही तितकाच महत्वाचा आहे. शिपाई ते अधिकारी हे सर्वच कोरोना लढ्यात जीव ओतून काम करीत आहेत. हा स्टाफच माझी ताकद आहे. त्यांना अडचणीत सहकार्य करणे आणि प्रोत्साहन देणे हे माझे कर्तव्य समजतो.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड