CoronaVirus : जामखेडला कोरोनाग्रस्त आढळताच बीड ‘अलर्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 12:06 PM2020-04-01T12:06:37+5:302020-04-01T12:08:47+5:30
पाटोदा तालुक्यातील सौताडा चेकपोस्टवर अडविलेल्या मजूरांची केली तपासणी
बीड : कोरोना विषाणू आता बीडच्या सिमेजवळ आला आहे. आष्टी, पाटोद्यालगत असलेल्या जामखेडमध्ये (जि.अहमदनगर) दोन कोरोनग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे आता बीडची यंत्रणाही अलर्ट झाली आहे. सौताडा चेकपोस्टवरून बंदी घालण्यात आली असून सर्वत्र खडा पहारा दिला जात आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात बीड जिल्ह्यातील एकही व्यक्ती नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
जिल्ह्याच्या सिमेवरच जामखेड आहे. आष्टी आणि पाटोदा हे दोन तालुके जामखेड लगत आहेत. याच जामखेडमध्ये दोन कोरोनग्रस्त रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बीड आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. बाहेरून येणाºयांचे लोंढे सुरूच असून ते अडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मंगळवारीही सौताडा चेकपोस्टवर सातारा जिल्ह्यातून उसतोड मजूर आले होते. त्यांनाही जिल्ह्यात प्रवेश नाकारण्यात आला. त्यांची वाहली आरोग्य केंद्रातील पथकाने तपासणी केली. त्यात एकालाही लक्षणे जाणवली नाहीत. ही गर्दी आल्याचे समजताच उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार मुंडलोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एल.आर.तांदळे, पोलीस निरीक्षक माने यांनी चेकपोस्टला भेट देत आढावा घेतला. तसेच चेकपोस्टवरून कोणीही जिल्ह्यात येणार नाही, याबाबत सक्त आदेश देण्यात आले.
संपर्कातील गावांमध्ये चौकशी
जामखेड शहरात ज्या गावातील लोकांचा संपर्क येतो, त्या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात आहे. बाधित लोकांच्या संपर्कात काही लोक आले आहेत का? याची चाचपणी सूत्रांकडून केली जात आहे. आशा, अंगणवाडी सेविकाही माहिती घेत आहेत. जवळपास आठ ते दहा गावांचा जामखेडशी संपर्क येत असल्याचे सूत्रांकडून समजते.
बाधितेच्या संपर्कात कोणी नाही
सर्वत्र योग्य त्या सुचना करण्यात आलेले आहेत. चेकपोस्टवरील व पथकांतील अधिकारी, कर्मचारी सर्वेक्षण व तपासणी करीत आहेत. बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेऊन तपासणी केली जात आहे. संशयितांना घर व संस्थात्मक अलगीकरण केले जात आहे. जामखेडमधील बाधितांच्या संपर्कात बीडमधील एकही व्यक्ती आली असल्याचे आतापर्यंत तरी सापडले नाही.
- डॉ.आर.बी.पवार,जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
सर्वेक्षण आणि तपासणी सुरू
सौताडा चेकपोस्टवर बाहेरून आलेल्या मजूरांची तपासणी करण्यात आली. कोणालाच लक्षणे जाणवली नाहीत. आमचे पथक तैनात आहे. तसेच बाधितांच्या संपर्कात कोणी आहे का? याची माहिती घेतली जात आहे. आशा, अंगणवाडी सेविका सर्वेक्षण करीत आहेत. तसेच पथकांकडूनही आढावा घेतला जात आहे.
- डॉ.एल.आर.तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा.