CoronaVirus : प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीड कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:53 AM2020-05-04T11:53:35+5:302020-05-04T11:55:45+5:30
आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.
बीड : बीड जिल्हा सध्या कोरोनामुक्त आहे. जिल्हा प्रशासनाने सुरुवातीपासूनच केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळेच बीडचा शून्य कायम राहिला आहे. सीमाबंदी, नियंत्रणकक्ष, विशेष पथके, चेकपोस्ट तपासणी अन् गावपातळीवरील सर्वेक्षणाचा मोठा फायदा झाला आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे कोरोना सीमेवरच रोखण्यात यश आले आहे.
जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जबाबदारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिनस्थ असलेल्या यंत्रणेची आहे. सुरुवातीपासूनच विदेश, परजिल्ह्यातून आलेल्या लोकांचे सर्वेक्षण करुन माहिती घेतले. त्यांच्याशी वारंवार संपर्क करुन लक्षणे असणाºयांची आरोग्य तपासणी केली. यासाठी विशेष पथके नियुक्त केली. जिल्हा व आरोग्य प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सूचना केल्या जात होत्या. याचे पालन नागरिकांनी केले. जे लोक छुप्या मार्गाने आले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे जरब बसली होती. याचाच फायदा आतापर्यंत होत आलेला आहे. या उपाययोजनांमुळेच बीड जिल्हा सद्यस्थितीत कोरोनामुक्त आहे.
काय केल्या उपाययोजना
२४ तास नियंत्रण कक्ष
जिल्ह्याच्या ठिकाणी २४ तास नियंत्रण कक्ष स्थापन केला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश शिंदेसह १३ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचे संपर्क शोधणे, संशयित प्रवासी शोधणे, बाहेरुन आलेल्यांशी संपर्क साधून लक्षणे आहेत का याची माहिती घेणे ही सर्व माहिती अद्ययावत करण्याचे काम नियंत्रण कक्षातून करण्यात आले.
सीमेवरील चेकपोस्टवर तपासणी
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. १४ ठिकाणी चेकपोस्ट तयार केल्या. त्या सुरु झाल्यापासून ७४ हजार ६६ लोकांच्या नोंदी घेतल्या. प्रत्येकाची नोंद व आरोग्य तपासणी करण्यात आली.
गावपातळीवर सर्वेक्षण
प्रत्येक शहर व गावात आशा स्वयंसेवीकांमार्फत घरोघरी जाऊन दोनदा सर्वेक्षण करण्यात आले. यात परदेशातून ११८, परजिल्ह्यातून १ लाख ९४ हजार ४१५ नागरिक आल्याचे उघड झाले. सर्वांना होम क्वारंटाईन करुन लक्षणांबाबत माहिती घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यात तब्बल ४४० पथके नियुक्त करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी सोपवली होती.
३३ हजार ऊसतोड मजुरांची तपासणी
ऊसतोडणीसाठी बाहेर गेलेल्या मजुरांना जिल्ह्यात आणले. २० चेकपोस्टवर त्यांची नोंद घेऊन आरोग्य तपासणी केली. २८ दिवसांसाठी क्वारंटाईन केले. १ मे पर्यंत ३३ हजार ४११ मजुरांनी जिल्ह्यात प्रवेश केला होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, ग्रुप कॉलिंग अशा माध्यमातून सूचना केल्या. विविध अॅपच्या माध्यमातून माहिती संकलित केली. लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद घेतली. होम क्वारंटाईन असलेल्यांवर नजर ठेवली. आरोग्य सेतू अॅपमार्फत स्वत:ची तपासणीही करुन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. कॉन्टॅक्ट ट्रॅकिंग करण्यात आले.
दररोज १२ हजार लोकांची तपासणी
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळताच परिसरातील ७ किलोमीटरमधील ११ गावे बंद केली. १०० घरांमागे १ प्रमाणे अशा ३० पथकांमार्फत नियमित २६२० घरांपर्यंत जाऊन त्यातील १२ हजार ३४५ व्यक्तींशी संवाद साधला. लक्षणे असणाºयांची तात्काळ तपासणी केली. १४ दिवस ही प्रक्रिया सुरु होती.
कोव्हीड योध्दा म्हणून यांचा सहभाग
आरोग्य, पोलीस यांच्याबरोबरच महसूल, जिल्हा परिषद, नगरपालिका, शिक्षण, बँक, महावितरण, बीएसएनएल, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा, पत्रकार अशा सर्वांनीच कोरोनावर मात करण्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे.
सुरुवातीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजन केल्यामुळे कोरोनाला सीमेवर रोखण्यात यश आले आहे. हा कोरोना जिल्ह्यात येऊ नये म्हणून प्रशासन तर प्रयत्न करीतच आहे, मात्र नागरिकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. आर. बी. पवार
जिल्हा आरोग्य अधिकारी.