CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; आणखी तीन स्वॅब प्रयोगशाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:25 AM2020-04-27T11:25:54+5:302020-04-27T11:45:20+5:30
अंबाजोगाईत दोन व बीड जिल्हा रुग्णालयात एक असे तीन रुग्ण दाखल आहेत.
बीड : जिल्ह्यातून कोरोना संशयित असलेल्या दोघांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. अंबाजोगाईत दोन व बीड जिल्हा रुग्णालयात एक असे तीन रुग्ण दाखल आहेत. त्यांचा अहवाल सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. सध्या बीड जिल्हा कोरोनामुक्त आहे. हा शुन्य कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून १९२ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पैकी १८९ स्वॅबच रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. सोमवारी घेतलेल्या तीन स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील आष्टी येथील एकमेव कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन पिंपळा या गावी परतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली.
अफवांवर विश्वास ठेवू नका
बीड शहरात नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी छोटे मोठे रस्ते वाहतूकीस बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याला कोरोनाचे वळण दिले आहे. रुग्ण आढळल्यामुळेच हे रस्ते बंद केल्याच्या अफवा शहभर पसरल्या आहेत. परंतू बीड जिल्हा हा अद्यापही कोरोनामुक्त आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घरात राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.