coronavirus : मिशन झिरोसाठी नागरिकांनी सहकार्य करावे : प्रीतम मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 07:16 PM2020-08-18T19:16:28+5:302020-08-18T19:19:15+5:30
आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी खा.प्रितम मुंडे यांची कोविड सेंटरला भेट
परळी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी परळी शहरातील कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यात परळीसह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनातर्फे मिशन झिरो अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर खा.प्रितम मुंडे यांनी परळी शहरातील अँटीजन टेस्ट केंद्रांना आज भेट देऊन नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला व मिशन झिरोसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
परळी शहरातील नटराज सभागृह, सुभाष चौक परिसरातील सरस्वती विद्यालय व माळी वेस भागातील अँटीजन टेस्ट केंद्रांना भेट देऊन खा.डॉ. प्रितम मुंडे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व्यवस्था व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. तर नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी अँटीजन टेस्ट केंद्रांवर टेस्टिंग टेबल्स वाढवण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी प्रशासनाला केल्या.
यासोबतच खा. मुंडे यांनी परळी शहरातील बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथील कोविड सेंटरला भेट देऊन आढावा घेतला. तसेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत, तुमच्या कामाचा अभिमान असून या संकटात स्वतःच्या आरोग्याची ही काळजी घेण्याचे सांगत त्यांचे मनोधैर्य वाढवले.