coronavirus : दिलासादायक ! धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:28 AM2020-06-13T11:28:17+5:302020-06-13T11:29:39+5:30
परळीतील रेशन दुकानदार पॉझिटिव्ह आढळून आला आहे
बीड : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त झाला असून ते सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. तर अन्य एक जण परळीतील रेशन दुकानदार पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे बीडची एकूण रुग्णसंख्या ८७ झाली आहे.
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांचा स्वीय सहायक व इतर पाच जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले होते. त्यांनतर शुक्रवारी त्यांच्या कुटुंबासह संपर्कातील लोकांचे स्वॅब घेण्यात आले. यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य, सुरक्षा रक्षक, कामगार, चालक आदींचा समावेश होता. रात्री २ वाजता त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यात सर्व निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, परळी शहरातीलच एका रेशन दुकानदारालाही लक्षणे जाणवू लागल्याने त्याचा स्वॅब घेतला होता, तो पॉझिटिव्ह आला आहे. पालकमंत्री यांच्या संपर्कात हा दुकानदार नव्हता, असेही समजते. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ८७ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ६४ कोरोनामुक्त तर दोघांचा मृत्यू झालेला आहे. सध्या २१ जणांवर उपचार सुरू आहेत.