coronavirus : बीडमध्ये लसीकरणादरम्यान गोंधळ; जमावाकडून पोलिसांना धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:30 PM2021-05-05T19:30:35+5:302021-05-05T19:32:10+5:30
coronavirus : लसीकरणावेळी गर्दी नियंत्रणात आणताना झालेल्या वादातून घडला प्रकार
बीडःबीडच्या जिल्हा रुग्णालयात बुधवारी सकाळच्या सुमारास लसीकरणावरुन गोंधळ उडाला, यावेळी गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न करणाऱ्या बीडच्या पोलीस उपाधिक्षकांनाही जमावाकडून धक्काबुक्की झाली. दरम्यान, पोलिसांनी गोंधळ करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज केला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे.
बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या लसीकरणावरुन रोजच गोंधळ होत आहे. लस कमी पडत असल्याने नागरिकांची गर्दी उसळत आहे. बुधवारी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान अशीच गर्दी जिल्हा रुग्णालयात जमा झाली होती. यावेळी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न बंदोबस्तावर असलेल्या पोहेकॉ.अनुराधा गव्हाणे व होमगार्ड सय्यद हे करत होते. मात्र, त्यांना न जुमानता काहीजणांनी गोंधळ सुरुच ठेवला. त्यानंतर उपाधीक्षक संतोष वाळके व त्यांचे अंगरक्षक पोशि डोके त्याठिकाणी गेले. यावेळी समजावून सांगत असताना याचे वादत रुपांतर झाले.
दरम्यान, सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना जमावाने धक्काबुक्की केली. यामध्ये बीडचे पोलीस उपाधिक्षक संतोष वाळके हे किरकोळ जखमी झाले. तसेच त्यांच्या अंगरक्षक डोके यांच्या अंगठ्याला यावेळी मार लागला. तर, होमगार्ड सय्यद यांच्या पायावर रॉड मारून जखमी केले. दरम्यान, पोलिसांनी यानंतर जमावावर लाठीचार्ज केला. याप्रकरणी पोहेकॉ.अनुराधा गव्हाणे यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात विवेक रविंद्र फुटान, महेंद्र राजेंद्र फुटाने, पार्थ महेंद्र फुटाने, नितीन राजेंद्र फुटाने (रा. नेकनूर ता.बीड), स्वप्निल अरूण पवार (रा. पंचशिल नगर बीड ) अक्षय विष्णू सानप (भक्ती कन्सट्रक्शन बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सपोनि मुस्तफा शेख हे करत आहेत.