CoronaVirus : कोरोनाची कमाल... विक्रीच नसल्याने काकडीचा झाला भोपळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 01:26 PM2020-04-22T13:26:08+5:302020-04-22T13:29:16+5:30
विक्रीस आणलेला निम्मा भाजीपाला फेकून देण्याची वेळ
- अनिल भंडारी
बीड : पिकलेलं माळवं शहरात नेऊन विकता येईना... अडीच तासात विकून विकून किती विकणार. उरलेला परत न्यायची वेळ, फेकून दिले तर जनावरेही खाईनात.. काकडीतर टनावर उगवली. काकडीचा भोपळा झाला.. फेकून द्यायची वेळ आली बघा...अशी व्यथा गेवराई तालुक्यातील रुईधानोरालगत असलेल्या जळगाव मंजरा येथील सतीश गव्हाणे नामक भाजी उत्पादक शेतकरी व्यक्त करीत होता.
सतीश गव्हाणे भाजीशेती करतात. भेंडी, गवार, टोमॅटो, मिरची, काकडीचे उत्पादन घेतात. मंगळवारी संचारबंदीतील शिथिल वेळ संपली आणि भाज्यांचे एकावर एक असे चार कॅरेट लावलेल्या दुचाकीवरुन गावची वाट धरली. वाटेत लोकमत प्रतिनिधीने थांबवून चर्चा केली असता भाजी उत्पादकांची व्यथा समोर आली. वेळ कमी असल्याने आणलेला भाजीपाला विकत नाही. फिरुन विकायलाही परवडत नाही. आधी चांगलं होतं, एकाच ठिकाणी बसून कमी- जास्त दरात विकायचो पण सगळा भाजीपाला विकत होता. विक्रीला वेळ वाढवून दिलातरी लोक बाहेर येत नाहीत. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आता निम्मा माल परत घरी घेऊन जावा लागतोय. सुकून खराब होतो. त्यात उद्या परत बंद आला. कसा विकणार भाजीपाला? असा सवाल करतानाच जनावरंही खाऊन कंटाळल्याचे तो म्हणाला.
सारं कसं पांगलंय
लहान भाजी उत्पादक शेतकऱ्यांना कोणी समजुनच घेईना.पहिले व्यवस्थित होतं, लॉकडाऊनपासून सगळं गणितच बिघडलं बघा. एक- दोन ग्राहक खरेदी करु लागले की, गर्दी करु नका म्हणत हुसकावलं जातं. आमचे भाव परवडणारे अन् माल ताजा असतो, पण सारं कसं पांगलंय. शिल्लक राहिलेला भाजीपाला फेकून द्यावा लागतोय, जनावरंही खाऊन- खाऊन कंटाळल्याचे हा शेतकरी म्हणाला. गावात इतरही अनेक भाजी उत्पादक शेतकरी आहेत, पण अशा परिस्थितीमुळे तेही माळवं विकायला येत नसल्याचे सतीश गव्हाणे म्हणाला.
चल गं काकडी टुणूक टुणूक... आहे शेतातच पडून
बालजगतमध्ये ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ अशी लघुकथा होती. मात्र सध्याच्या परिस्थिती ‘चल गं काकडी टुणूक टुणूक म्हणायची वेळ आली आहे. परंतू कोरोनामुळे शेतातच २ किलो भोपळ्याएवढी पिकलेली पोसलेली काकडी पाहून उत्पादकांवर रडायची वेळ आली आहे. सतीश गव्हाणे यांनी त्यांच्या एक एकर शेतात काकडीचे पीक घेतले. बी, खत, औषधे, वेल व्यवस्थापन आणि कुंणावर १८ हजारापर्यंत खर्च केला. किमान सव्वालाख रुपये येतील अशी आशा होती. पदरी मात्र ४-५ हजारच आले. रोज तोडीवी लागते, पण तोडून विकायची कोठे हा प्रश्न आहे. त्यामुळे टनावर काकडी शेतातच पडून आहे. तिला बाहेर काढायचा खर्च वेगळाच लागणार आहे.
आमदनी अठन्नी, खर्चा रुपया
गावापासून बीडपर्यंत येणं जाणं दिडशे रुपयांचं पेट्रोल लागतं. भाजी विक्रीतून कसेबसे ४०० रुपये येतात. भाजी तोडणीला घरच्या लोकांशिवाय २०० रुपये रोजने गडी लावावा लागतो. घर कसं चालवायचं? हायतोवर जपतोय. भाजी विक्रीला विनात्रास वेळ वाढवून मिळाला तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया तरुण शेतकऱ्याने व्यक्त केली.